जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासन सतर्क; ‘गायमुख’ व ‘अन्नछत्र’ परिसराची आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाहणी
जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासन सतर्क; ‘गायमुख’ व ‘अन्नछत्र’ परिसराची आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाहणी
कोल्हापूर ०१ सिटी न्यूज नेटवर्क
श्री क्षेत्र जोतिबाची चैत्र यात्रा आज मुख्य दिवशी पोहोचली असून लाखो भाविकांनी डोंगरावर गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णतः सतर्क झाले असून आपत्ती व्यवस्थापन विभागाने महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ‘गायमुख’, ‘अन्नछत्र’ परिसर तसेच गर्दीची प्रमुख ठिकाणे तपासली. यावेळी त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ पथक तैनात करण्यात आले असून, गर्दी नियंत्रण आणि भाविकांना त्वरित मदत देण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वच विभाग ‘ॲक्शन मोड’मध्ये काम करत आहेत. पोलीस दलाकडून कडक बंदोबस्त व वाहतूक नियोजन, ग्रामपंचायत व पंचायत समितीकडून स्वच्छता आणि पाणीपुरवठा, आरोग्य विभागाकडून प्रथमोपचार केंद्रे व रुग्णवाहिका, तर विद्युत विभागाकडून अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यात येत आहे.
प्रशासनाकडून भाविकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले असून, “यात्रा सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. भाविकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे,” असे सांगण्यात आले.
लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासनाने कंबर कसली असून, यंदा यात्रा सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार पाडण्यावर भर देण्यात आला आहे.

Comments
Post a Comment