राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचार्‍यांच्या मानधन रचनेत बदलासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन


राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचार्‍यांच्या मानधन रचनेत बदलासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन


कोल्हापूर ०६ सिटी न्यूज नेटवर्क 

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांच्या मानधन रचनेत बदल करण्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांना निवेदन दिले आहे.

राज्यातील सीएचओ (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर) संघटनेकडून शासनाकडे मानधन रचनेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या सीएचओ म्हणजे डॉक्टर आणि जनतेमधील दुवा म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा ४० हजार रुपये मानधन दिले जाते. यात २५ हजार रुपये निश्चित वेतन आणि १५ हजार रुपये कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता समाविष्ट आहे.

मात्र, नव्या प्रस्तावानुसार ही रचना बदलून ३५ हजार रुपये निश्चित वेतन आणि ५ हजार रुपये कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता अशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या बदलामुळे ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचार्‍यांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

या प्रस्तावाबाबत महाराष्ट्र शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून पुढील कार्यवाहीसाठी तो प्रस्ताव केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती खासदार महाडिक यांनी नामदार नड्डा यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, आयुष्मान भारत योजना अंतर्गत आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचारी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. माता व बाल आरोग्य, आजारांचे स्क्रिनिंग तसेच जनजागृतीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे सकारात्मक लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Comments