नवीन पदभाराच्या पार्श्वभूमीवर आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांची काडसिद्धेश्वर स्वामीजींची भेट
कोल्हापूर ०९ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महानगरपालिकेत गेली तीन वर्षे आयुक्त व प्रशासक म्हणून यशस्वीपणे कामकाज पाहिलेल्या के. मंजूलक्ष्मी यांची नुकतीच पुणे महानगरपालिकेत बदली झाली आहे. नवीन पदभार स्वीकारण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी श्रीक्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी येथे जाऊन पूज्यश्री काडसिद्धेश्वर महास्वामीजींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी त्यांनी स्वामीजींसोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली तसेच आगामी कार्यासाठी मार्गदर्शनही घेतले. सिद्धगिरी मठावर नुकताच पार पडलेल्या ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’ या उत्सवाबाबत त्यांनी विशेष उल्लेख केला. नियोजित कार्यक्रमामुळे या महोत्सवात सहभागी होता आले नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या वेळी स्वामीजींनी भविष्यात कोल्हापूरमध्ये लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून अशा प्रकारचे कायमस्वरूपी कारागीर प्रदर्शन आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
कोल्हापूर महानगरपालिकेत कार्यरत असताना आलेले विविध अनुभव, तसेच शहराच्या विकासासाठी केलेली कामे आणि घेतलेले निर्णय याबाबतही मंजूलक्ष्मी यांनी मनोगत व्यक्त केले. केरळ येथील मूळ रहिवासी असल्यामुळे सिद्धगिरी मठामार्फत केरळमध्ये राबविण्यात आलेले समाजोपयोगी उपक्रम आणि पूरग्रस्तांना दिलेली मदत याबाबत त्यांनी गौरवोद्गार काढले.
भविष्यातही मठाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी उपक्रमात सहभागी होण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विवेक सिद्ध, सुजित पाटील, अनुराधा शिंदे आणि दयानंद डोंगरे उपस्थित होते.

Comments
Post a Comment