वनताराकडून जगातील पहिले वन्यजीव व पशुवैद्यक जागतिक विद्यापीठ
जामनगर (गुजरात), १० सिटी न्यूज नेटवर्क
अनंत अंबानी यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या वनतारा या जागतिक वन्यजीव संरक्षक उपक्रमाने गुजरातमधील जामनगर येथे जगातील पहिले एकात्मिक वन्यजीव आणि पशुवैद्यक शास्त्राचे जागतिक विद्यापीठ उभारण्याची घोषणा केली आहे.
हे विद्यापीठ आधुनिक काळातील ‘गुरुकुल’ संकल्पनेवर आधारित असून वन्यजीव संरक्षण आणि पशुवैद्यक शिक्षण या क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर अग्रस्थान मिळवून देणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.
वन्यजीव संरक्षण, पशुवैद्यक औषधशास्त्र आणि प्राण्यांचे जतन या क्षेत्रात संशोधनाला चालना देत भविष्यातील तज्ञ घडविण्यावर विद्यापीठाचा भर असेल. भारताच्या पारंपरिक ज्ञानपरंपरेचा आधार घेत अत्याधुनिक आणि भविष्याभिमुख अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहेत.
यावेळी बोलताना अनंत अंबानी यांनी सांगितले की, “प्रत्येक जीवाचे संरक्षण करणारी नवी पिढी घडविणे हेच या विद्यापीठाचे ध्येय आहे.” त्यांनी प्राचीन नालंदा विद्यापीठ यांच्या मूल्यांचा आणि ‘आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः’ या ऋग्वेदीय बोधवाक्याचा संदर्भ देत ज्ञानाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला.
विद्यापीठाच्या भूमिपूजन सोहळ्यात भारताच्या विविध जैवविविधतेचे प्रतीक म्हणून देशातील गवताळ प्रदेश, जंगल, पाणथळ भाग, हिमालय तसेच विविध पर्वतरांगांमधून आणलेली माती, पाणी आणि पाषाण यांचा समावेश करण्यात आला. हे भारताच्या समृद्ध नैसर्गिक वारशाचे प्रतीक असल्याचे सांगण्यात आले.
या विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर तसेच विशेष अभ्यासक्रम राबवले जाणार असून त्यात वन्यजीव औषधशास्त्र, शस्त्रक्रिया, प्राण्यांचे पोषण, वर्तनशास्त्र, अनुवंशिकता, साथीचे रोग आणि पर्यावरणपूरक पशुसंवर्धन यांचा समावेश असेल. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अत्याधुनिक शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निवासी संकुल यांसह हे विद्यापीठ कृतीआधारित संशोधनावर विशेष भर देणार आहे. वन्यजीवांचे आरोग्य, संवर्धन आणि दीर्घकालीन व्यवस्थापन यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे उद्दिष्टही यामागे आहे.
वनतारा विद्यापीठाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण क्षेत्रात केवळ जनजागृती नव्हे, तर शास्त्राधारित ज्ञानव्यवस्था आणि प्रशिक्षित तज्ञ निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न करण्यात येत आहे.



Comments
Post a Comment