वारकरी संत परंपरेचा अवमान? धर्मवीर अध्यात्मिक सेना आक्रमक; राज्यभर तक्रारींचा इशारा

 वारकरी संत परंपरेचा अवमान? धर्मवीर अध्यात्मिक सेना आक्रमक; राज्यभर तक्रारींचा इशारा



कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क 

वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने शरद पवार गटाचे प्रवक्ते श्री. विकास लवंडे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. संबंधित वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप तक्रारदारांनी केला असून, समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


तक्रारदारांच्या मते, अलीकडेच सार्वजनिक माध्यमांमध्ये बोलताना विकास लवंडे यांनी वारकरी संप्रदायातील संत परंपरा व महात्म्यांविषयी अवमानकारक भाष्य केले. या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायात तीव्र नाराजी निर्माण झाली असून, धार्मिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


या प्रकरणी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना, कोल्हापूर जिल्हा  यांच्या वतीने जुना राजवाडा पोलिस स्टेशन येथे लोंढे साहेब यांच्याकदेव निवेदन देण्यात आले. यावेळी सेनेचे कोल्हापूर शहर समन्वयक आदित्य जमदाडे,रोहित अतिग्रे, तुषार पवार, कैलास शिंदे, गणेश अतिग्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


तसेच, संबंधित व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यात विशेषतः


* कलम 295(A) – धार्मिक भावना दुखावणे

* कलम 153(A) – विविध गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणे

* कलम 500 – मानहानी

* कलम 505(2) – समाजात द्वेष पसरवणारे विधान


या कलमांचा समावेश आहे.


तक्रारदारांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


दरम्यान, सदरचे निवेदन महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना यांच्या वतीने देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळे राज्यभरात या मुद्द्यावर आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Comments