निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची औद्योगिक कंपनीत दादागिरी?; मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार, चौकशीचे आदेश
सातारा १० सिटी न्यूज नेटवर्क
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात मावशी येथे स्थलांतरित होत असलेल्या एका औद्योगिक कंपनीत ठेकेदारी काम मिळविण्यासाठी निवृत्त पोलिस अधिकारी प्रकाश राऊत यांनी दबाव टाकत दादागिरी केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत जेष्ठ नागरिक ताराबाई दुधाणे यांनी थेट Devendra Fadnavis यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली असून, मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेत गृहखात्याला चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे कार्यरत असलेली ‘वोहर पार्किंग सिस्टीम प्रा. लि.’ ही कंपनी आता सातारा जिल्ह्यातील मावशी येथे स्थलांतरित होत आहे. या कंपनीतील ठेकेदारी कामे मिळवण्यासाठी प्रकाश राऊत हे स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून कंपनीवर दबाव टाकत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदार ताराबाई दुधाणे यांनी नमूद केले आहे की, गेली १४ वर्षे संबंधित कंपनीतील स्क्रॅप काम ‘पृथ्वीराज एंटरप्रायझेस’मार्फत त्यांच्या दिवंगत मुलगा सुभाष दुधाणे यांच्या भागीदारीत सुरू होते. त्यांच्या निधनानंतरही हे काम सुरू होते आणि त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, कंपनी स्थलांतरित होत असताना राऊत यांच्या कथित हस्तक्षेपामुळे त्यांच्या कुटुंबासमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तक्रारीनुसार, राऊत हे कंपनीत जाऊन कामाची मागणी करत असून, आपण अद्याप सेवेत असल्याचा आभास निर्माण करीत आहेत. तसेच, मुंबईतील एका प्रभावशाली राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप असल्याचे सांगून कंपनीच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचाही आरोप आहे. याशिवाय, त्यांनी मोबाईलच्या डीपीवर पोलिस वर्दीतील फोटो ठेवून ‘महाराष्ट्र पोलिस’ असा उल्लेख केल्याने ते अद्याप सेवेत असल्याचा भास निर्माण होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात ते दीड वर्षांपूर्वी निवृत्त झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ताराबाई दुधाणे यांनी पुण्यात मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले असून, त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून गृहखात्याकडे चौकशीसंदर्भात ई-मेल पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील चौकशीनंतरच सत्यस्थिती स्पष्ट होणार आहे.

Comments
Post a Comment