कोल्हापूरात विश्वशांतीसाठी नवकार महामंत्र पठण; विक्रमी सहभागाने साकारला विश्व विक्रम
कोल्हापूर ०९ सिटी न्यूज नेटवर्क
जगभरात वाढत चाललेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शांतता, सद्भाव आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा संदेश देणारा नवकार महामंत्र जागतिक स्तरावर घुमला. भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमात कोल्हापूर शहरासह जगभरातील लाखो भाविकांनी विक्रमी संख्येने सहभाग नोंदवत विश्व विक्रमाला गवसणी घातली.
“भारतीय संस्कृतीत आणि नवकार महामंत्रात संपूर्ण विश्वाला शांततेकडे नेण्याची ताकद आहे. हा मंत्र समाजमंत्र बनावा आणि भारताची विधायक ओळख जागतिक स्तरावर निर्माण व्हावी,” असे प्रतिपादन आचार्य विजय अभय शेखर सुरि – श्री लक्ष्मी सेन महास्वामीजी यांनी आपल्या मनोगतात केले.
"जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन" (जीतो)च्या वतीने जगभरातील 130 ठिकाणी तसेच भारतात 8000 हून अधिक ठिकाणी सामुदायिक नवकार महामंत्र पठणाचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम महासैनिक दरबार हॉल येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
जगभरातील युद्ध, आतंकवाद आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमात तीन कोटींहून अधिक लोक सहभागी झाले. गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एक कोटी आठ लाख लोकांनी एकाच वेळी महामंत्र पठण करून विक्रम प्रस्थापित केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ९ एप्रिल हा ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला असल्याची माहिती जितो कोल्हापूर चॅप्टरचे अनिल पाटील यांनी दिली.
जैन धर्मातील नवकार महामंत्र हा अत्यंत शक्तीशाली मानला जातो. या मंत्राद्वारे अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू यांना नमन केले जाते. आत्मकल्याण आणि मोक्षमार्गाची दिशा देणारा हा मंत्र भविष्यात अधिक व्यापक करण्याचा निर्धार रवी संघवी यांनी व्यक्त केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांनी जैन समाजाच्या देशाच्या विकासातील योगदानाचे कौतुक केले, तर महापौर रूपाराणी निकम यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
जीतो कोल्हापूर व इचलकरंजी चॅप्टरच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम भव्य प्रमाणात पार पडला. कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटक सीमाभागातील जैन बांधवांनी विविध जैन मंदिरे व तीर्थक्षेत्रांमध्ये एकत्र येत सामूहिक पठण केले. दिल्ली येथील मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले असून त्याचे थेट प्रक्षेपणही दाखवण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात ३४ हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. या उपक्रमात जैन समाजासोबत इतर समाजघटकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमासाठी संजय घोडावत ग्रुप हे मुख्य प्रायोजक होते. ज्येष्ठ कार्यकर्ते ललित गांधी, पद्माकर कापसे, नाना पाटील, किरण मिठारी, जयेश ओसवाल, माजी नगरसेवक ईश्वर परमार, राजू मंच, संजय उपाध्ये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गेले दीड महिना जीतो कोल्हापूरचे चेअरमन रवी संघवी, मानद सचिव अनिल पाटील, समन्वयक जितेंद्र राठोड, राजीव परीख, रवींद्र देवमोरे, युथ विंग चेअरमन प्रतिक ओसवाल, लेडीज विंग माया राठोड, गिरीष शहा आणि सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments
Post a Comment