जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व गौरवपूर्ण वातावरणात साजरी
जिल्हा परिषद कोल्हापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व गौरवपूर्ण वातावरणात साजरी
कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त जिल्हा परिषद च्या तळमजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती जॅसमिन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून महान समाजसुधारक, विचारवंत व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.
या प्रसंगी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. जॅसमिन यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ. आंबेडकर यांनी समाजातील वंचित, शोषित व दुर्बल घटकांसाठी आयुष्यभर संघर्ष करून त्यांना न्याय व समानतेचा अधिकार मिळवून दिला. शिक्षण, सामाजिक समता, बंधुता व न्याय या मूल्यांच्या प्रसारासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करून आपल्या कार्यात पारदर्शकता, जबाबदारी व सेवाभाव ठेवण्याचे आवाहन केले.
तसेच त्यांनी नमूद केले की, शासन यंत्रणेतील प्रत्येक घटकाने संविधानातील मूल्यांचे पालन करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे ही काळाची गरज आहे. डॉ. आंबेडकर यांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक असून त्यांच्या आदर्शांवर चालत प्रशासन अधिक लोकाभिमुख व प्रभावी बनविणे आवश्यक आहे.
सदर कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संतोष जोशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमप्रकाश यादव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. जयवंत उगले, कार्यकारी अभियंता श्री. अर्जुन गोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्रीमती माधुरी परीट, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुर्वणा सावंत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती शेडकर, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. अविनाश मेश्राम तसेच जिल्हा परिषद, कोल्हापूर येथील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. कार्यक्रमात शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्रीमती सुषमा पाटील यांनी केले.

Comments
Post a Comment