युद्धजन्य पार्श्वभूमीवर युवकांचा विजय संकल्प; हनुमान जयंतीनिमित्त कोल्हापुरात २०० पेक्षा अधिक ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’
युद्धजन्य पार्श्वभूमीवर युवकांचा विजय संकल्प; हनुमान जयंतीनिमित्त कोल्हापुरात २०० पेक्षा अधिक ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’
कोल्हापूर ०२ सिटी न्यूज नेटवर्क
जागतिक पातळीवर वाढत्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युवकांनी विजयाचा संकल्प करत हनुमान जयंती निमित्त सामूहिक ‘गदापूजन’ उपक्रम उत्साहात पार पाडला. हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला, तर कोल्हापूर जिल्ह्यातच २०० पेक्षा अधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
इतिहासातील विविध युद्धांमध्ये भगवान हनुमान यांची उपस्थिती विजयाचे प्रतीक मानली जाते. प्रभू श्रीरामांच्या लंकेवरील विजयात तसेच महाभारतात अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर विराजमान राहून अधर्माविरुद्ध शक्ती देणाऱ्या हनुमानांच्या पराक्रमाचे स्मरण यावेळी करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेत समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केलेल्या बलोपासनेचाही उल्लेख करण्यात आला.
देश आणि धर्म संकटात असल्याची भावना व्यक्त करत, युवकांमध्ये शौर्य, शक्ती आणि भक्ती जागृत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणा या राज्यांत हजारो युवकांनी यात सहभाग घेतला.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मनपाडळे येथील मारुती मंदिर तसेच जुने पारगाव येथील हनुमान मंदिरात विशेष कार्यक्रम पार पडले. विधीमध्ये गदापूजन, आरती, मारुती स्तोत्र पठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना यांचा समावेश होता.
‘रामराज्य स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’
कार्यक्रमाच्या शेवटी ‘श्री हनुमते नमः’ या नामजपासह ‘रामराज्य स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. ‘रामराज्यासाठी हनुमानांचे गुण आत्मसात करण्याचे’ मार्गदर्शनही उपस्थितांना करण्यात आले.
गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून, यंदाही युवक आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. शाहुवाडी (मलकापूर) येथील जय हनुमान कुस्ती संकुलासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Comments
Post a Comment