स्वतःच स्वप्न बना; जीवनाला दिशा मिळेल – कानिफनाथ महाराज
पादुका दर्शन सोहळ्यात मार्गदर्शन; २०० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
कोल्हापूर १२ सिटी न्यूज नेटवर्क
“स्वप्नांच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच स्वप्न बना; तेव्हाच जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळते,” असा हृदयस्पर्शी संदेश परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी दिला. त्यांच्या प्रभावी प्रवचनाने उपस्थित भक्तगण मंत्रमुग्ध झाले.
येथील रामकृष्ण भव्य हॉलमध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज (नाणीज) यांच्या वतीने आयोजित पादुका दर्शन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यास जिल्हाभरातून आलेल्या दहा हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती लाभली. गगनबावडा, राधानगरी, शिरोळसह सर्व बारा तालुके आणि नगरपरिषद क्षेत्रांतील भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.
प्रवचनात महाराजांनी आजच्या अस्थिर आणि स्पर्धात्मक जीवनात अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित केले. “जागतिक संघर्ष असो किंवा दैनंदिन अडचणी — त्यावर मात करण्यासाठी मन स्थिर ठेवणे आणि ईश्वरभक्तीत रमणे आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी नित्य साधना, सेवा आणि संयम या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
यावेळी २०० गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच गरजूंना वैद्यकीय साहित्य देण्यात आले. यासह ३०० हून अधिक स्त्री-पुरुष भक्तांना उपासक दीक्षा देण्यात आली. रक्तदान शिबिरे, रुग्णवाहिका सेवा, आरोग्य शिबिरे अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचा उल्लेख करत या कार्याची व्याप्ती वाढवण्याचे आवाहनही महाराजांनी केले.
जगतगुरु रामानंदाचार्य संप्रदायाच्या माध्यमातून कोकण व पश्चिम महाराष्ट्रात सामाजिक व अध्यात्मिक कार्याची मजबूत परंपरा निर्माण झाल्याचे नमूद करत, “भक्तांच्या सेवाभावी वृत्तीमुळे समाजात विश्वास दृढ होत आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देता अधिक निष्ठेने कार्य करणे हीच खरी साधना आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी, नीता सुतार, दिलीप कोळी, अमित लाड, राधा पाटील, सीमा पाटील, मधुकर बावकर, एम.आर. पाटील तसेच जनसंपर्क विभागाचे रमेश मगदूम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, १ मे रोजी विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा गुणगौरव सोहळा आणि १४ मे रोजी आसुले पोर्ले येथे वंदनीय नरेंद्र महाराज यांच्या दर्शन व प्रवचनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
पादुका दर्शन, प्रवचन, दीक्षा आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या संगमामुळे हा सोहळा कोल्हापूरच्या धार्मिक व सामाजिक क्षेत्रात विशेष ठरला.

Comments
Post a Comment