कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे शक्तिपीठ महामार्गाविरोधात संघर्ष समितीच्या मेळाव्यात महामार्ग रद्द करण्याचा केला ठाम निर्धार

 कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे शक्तिपीठ महामार्गाविरोधात संघर्ष समितीच्या मेळाव्यात महामार्ग रद्द करण्याचा केला  ठाम निर्धार 


कोल्हापूर १५ सिटी न्यूज नेटवर्क 

आजऱ्यातील शिवाजी सावंत सभागृहात आयोजित या मेळाव्यात सतेज पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द झालाच पाहिजे. त्यासाठी आमचा लढा कायम राहील.” त्यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांचा गेल्या दोन वर्षांपासून असलेला संघटित विरोध पाहूनच सरकारला अलाइनमेंट बदलावी लागली आहे. मात्र, शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून राजू शेट्टी यांनीही जोरदार टीका करत महामार्ग प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. “मूठभर ठेकेदार आणि सत्ताधारी आमदारांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला जात आहे. हा महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा असल्यास सरकारने ते सिद्ध करून दाखवावे,” असे आव्हान त्यांनी दिले.

माजी आमदार राजेश पाटील यांनी चंदगड परिसरातील जैवविविधता आणि पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. या महामार्गामुळे वन्यजीव मानवी वस्तीत शिरण्याचा धोका वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी महामार्ग प्रकल्पात काही खासगी हितसंबंध असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली. संपत देसाई यांनी या प्रकल्पामुळे पर्यावरणाबरोबरच स्थानिक संस्कृतीही धोक्यात येईल, असे मत व्यक्त केले. तसेच, यापूर्वीच्या प्रकल्पांतील विस्थापितांचे पुनर्वसन पूर्ण झाले नसताना नव्या प्रकल्पासाठी पुन्हा विस्थापनाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या मेळाव्यात पुढील काळात जिल्हा व तालुकास्तरावर सभा घेऊन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाचे मुख्य केंद्र कोल्हापूर राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

मेळाव्याला विविध पदाधिकारी, स्थानिक नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments