सिद्धगिरी कारागीर महाकुंभाची सांगता; शासनाने कारागिरांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन – काडसिद्धेश्वर स्वामीजी
सिद्धगिरी कारागीर महाकुंभाची सांगता; शासनाने कारागिरांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन – काडसिद्धेश्वर स्वामीजी
कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क
कणेरी येथील श्री सिद्धगिरी संस्थान मठात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कारागीर महाकुंभाची शनिवारी उत्साहात सांगता झाली. पाच दिवस चाललेल्या या महोत्सवाला तब्बल ४ ते ५ लाख नागरिकांनी भेट दिली. समारोपप्रसंगी बोलताना प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी शासनाने कारागिरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.
या महाकुंभाचे आयोजन श्री सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी व महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात आले होते. कार्यक्रमाला आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे, समरजित घाटगे, नविद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वामीजी म्हणाले की, अठरापगड जातीतील अनेक पारंपरिक व्यवसाय आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लोहार, विणकर यांसारख्या कारागिरांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागातील नागरिक रोजगारासाठी मुंबईसारख्या शहरांकडे स्थलांतरित होत असून, स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध झाल्यास ही परिस्थिती बदलू शकते. पर्यटन उद्योगाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कणेरी मठात होत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करत, येथे भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन होत असल्याचे नमूद केले. कणेरी मठ हे समाजासाठी विविध उपयुक्त गोष्टींचे ‘विद्यापीठ’ व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले की, देशात स्टार्टअप संस्कृती वेगाने वाढत असून हस्तकलेलाही जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. या महाकुंभातून कारागिरांना नवे संधीद्वार खुले होईल. आमदार राहुल आवाडे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, समाजजागृतीसाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.
या महाकुंभात देशातील १७ राज्यांमधील सुमारे २०० कारागीर सहभागी झाले होते. एकूण १५० स्टॉल उभारण्यात आले होते. विशेष म्हणजे, कारागिरांना मोफत स्टॉल व प्रवासखर्च देण्यात आला होता. अनेक स्टॉलवरील वस्तूंची विक्री विक्रमी प्रमाणात झाली. उर्वरित वस्तू कणेरी मठाकडून खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
याशिवाय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले. यामध्ये राजाराम बापू टेक्निकल महाविद्यालय, इस्लामपूर यांना प्रथम, आण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, आष्टा यांना द्वितीय, तर डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांक देण्यात आला.
पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात कारागिरांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध प्रदर्शनांनी वातावरण भारावून गेले होते. कार्यक्रमानंतरही उशिरापर्यंत नागरिकांनी महाकुंभाला भेट देत मोठा प्रतिसाद दिला.

Comments
Post a Comment