ए. आय. - बायोमेकॅनिक्सचा योग्य समन्वय गरजेचा – डॉ. सुदीप काळे
![]() |
| 📸 फिजियोसेतू पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. सुदीप काळे, स्वप्नील पाटील, डॉ. व्ही. व्ही. भोसले, अभय जोशी, डॉ. अमृतकुंवर रायजादे व डॉ. जावेद सागर. |
📍 ‘फिजिओसेतू 2026’ राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न
कोल्हापूर १३ सिटी न्यूज नेटवर्क
फिजिओथेरपिस्ट हा आरोग्य व्यवस्थेतील अविभाज्य घटक बनत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि बायोमेकॅनिक्स यांचा समन्वय अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. सुदीप काळे यांनी केले.
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे आयोजित ‘फिजिओसेतू 2026’ या राष्ट्रीय परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ए. आय. आणि बायोमेकॅनिक्स यांच्या एकत्रित वापरामुळे आरोग्यसेवा अधिक अचूक, प्रभावी आणि रुग्णकेंद्रित होऊ शकते.
‘बायोमेकॅनिक्स आणि ए. आय. समन्वय : मानवी कार्यक्षमता आणि आरोग्यातील नवे क्षितिज’ या विषयावर आयोजित परिषदेत विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू स्वप्नील पाटील, तसेच प्राचार्य डॉ. अमृतकुंवर एस. रायजादे यांचा समावेश होता.
प्राचार्य डॉ. रायजादे यांनी स्वागत करताना ही परिषद वर्तमान ज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञान यांना जोडणारा एक महत्त्वपूर्ण ‘सेतू’ असल्याचे सांगितले. देशभरातील विविध राज्यांतून मोठ्या संख्येने प्रतिनिधी सहभागी झाले होते.
अर्जुन पुरस्कार विजेते स्वप्नील पाटील यांनी क्रीडा क्षेत्रात फिजिओथेरपीचे महत्त्व अधोरेखित करताना, कार्यक्षमता वाढविणे, दुखापती टाळणे आणि प्रभावी पुनर्वसनासाठी फिजिओथेरपीची भूमिका अनन्यसाधारण असल्याचे सांगितले.
परिषदेत डॉ. मंदार मालवाडे यांनी बालविकासातील संवेदन प्रक्रियेवर मार्गदर्शन केले, तर डॉ. बसवराज मोतिमठ यांनी खेळातील दुखापतींवर टेपिंग तंत्र याबाबत माहिती दिली.
या परिषदेत देशातील ५० हून अधिक संस्थांमधील ७५० पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले. सुमारे २५० संशोधन पेपर, पोस्टर सादरीकरणे आणि १८ मॉडेल सादरीकरणे पार पडली. ए. आय. आधारित उपचारपद्धती, क्रीडा दुखापती, मोशन कॅप्चर तंत्रज्ञान आणि आधुनिक पुनर्वसन पद्धती यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
परिषदेदरम्यान फिजिओथेरपी विषयक दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले तसेच ‘यंग अचिव्हर’, ‘बेस्ट एज्युकेटर’, ‘सायंटिफिक कॉन्ट्रिब्युशन’, ‘एक्सलन्स इन रिहॅबिलिटेशन’ आणि ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ अशा विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील तसेच कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
.jpg)



Comments
Post a Comment