सतेज पाटील यांचा वाढदिवस होणार लोकोत्सव
कार्यकर्त्यांचा संकल्प : दहा लाख वह्या संकलनाचे उद्दिष्ट
कोल्हापूर ०६ सिटी न्यूज नेटवर्क
काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार Satej Patil यांचा १२ एप्रिल रोजी होणारा वाढदिवस यंदा विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून “लोकोत्सव” म्हणून साजरा करण्याचा निर्धार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या वाढदिवसानिमित्त तब्बल दहा लाख वह्यांचे संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, “देऊया गरजूंना साथ – सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात” हे ब्रीद घेऊन जिल्हाभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यामध्ये रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, वृद्धाश्रमात फळवाटप, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, शालेय साहित्य वाटप, अपंग व निराधार मुलांना अल्पोपहार, काव्य संमेलन, औद्योगिक वसाहतींमध्ये वृक्षारोपण, तसेच फुटबॉल, करवीर सतेज चषक आणि लेदरबॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुका स्तरावरही विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आमदार सतेज पाटील यांनी २००७ पासून वाढदिवसानिमित्त हार-तुरे व पुष्पगुच्छ न स्वीकारता गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या देण्याचा उपक्रम सुरू केला असून, या उपक्रमाची नोंद Limca Book of Records मध्ये झाली आहे.
यंदा त्यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेतील ३८ नगरसेवकांच्या माध्यमातून ५४ हजार वह्या देण्याचा संकल्प विरोधी पक्षनेते राजू लाटकर यांनी जाहीर केला. तसेच जिल्हा परिषदेतील काँग्रेस गटनेते एकनाथ पाटील यांनी १५ सदस्यांच्या माध्यमातून ५४ हजार वह्या देण्याचा संकल्प केला आहे. युवराज गवळी यांनी गवळी समाजाच्या माध्यमातून ११ हजार वह्या देण्याबरोबरच पाचगाव येथे म्हैस शर्यतीचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या ग्रामदैवताला अभिषेक करून आमदार पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी यंदा दहा लाख वह्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला असून, युथ काँग्रेसच्या माध्यमातून २५ हजार वह्या देण्याची घोषणाही करण्यात आली.
आमदार सतेज पाटील हे वाढदिवशी दुपारी ४ नंतर कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
या बैठकीस आमदार जयंत आसगावकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, एकनाथ पाटील, राजू लाटकर, इंद्रजीत बोंद्रे, चेतन नरके, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, अभिजीत तायशेटे, शशिकांत खोत, भूपाल शेटे, भारती पोवार, तौफिक मुल्लानी, युवराज गवळी, बाळासाहेब सरनाईक, अक्षय शेळके, भरत रसाळे, संपतराव पाटील, संजय पोवार-वाईकर, मंगल खुडे, सरलाताई पाटील, उज्ज्वला चौगले, हेमा पाटील, संजय मोहिते, दुर्वास कदम, प्रवीण केसरकर, अर्जुन माने, अमर समर्थ, सुभाष बुचडे, विनायक कारंडे, अजित पोवार, सचिन चौगले, संतोष जरग, दिपाली घाटगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment