जागतिक आरोग्य दिनानिमित्त इ सिटी न्यूज विशेष
सावित्रीबाई फुले रुग्णालयात रुग्णांची लूट?
वॉर्डमध्ये खाजगी लॅबचा शिरकाव; ‘आरोग्य हक्क’ धोक्यात
कोल्हापूर ०७ सिटी न्यूज नेटवर्क
आज जागतिक आरोग्य दिन साजरा होत असताना ‘सर्वांसाठी परवडणारे आणि सुलभ आरोग्य’ हा संदेश दिला जातो. मात्र, याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालय येथील धक्कादायक प्रकार समोर आल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना रक्तचाचण्यांसाठी थेट खाजगी लॅबकडे पाठवले जात असल्याचे उघड झाले आहे. या चाचण्यांसाठी प्रत्येकी ₹1000 ते ₹1500 पर्यंत शुल्क आकारले जात असून, सर्वसामान्य रुग्णांवर आर्थिक ताण वाढत आहे.
वॉर्डमध्येच खाजगी लॅबची एन्ट्री
अधिक धक्कादायक बाब म्हणजे, खाजगी लॅबचे कर्मचारी थेट वॉर्डमध्ये येऊन रुग्णांचे रक्त घेत असल्याचे आरोप आहेत. अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना याची माहितीही दिली जात नाही. शासनाची महालॅब असताना तिथे अधिका अधिक टेस्ट होत असताना खासगी लॅब ची काय गरज अशीही रुग्णांच्या नातेवाईकडून विचारणा होत असते.
यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत
रुग्णालय प्रशासनाच्या परवानगीशिवाय वॉर्डमध्ये प्रवेश कसा?
रुग्णांची वैद्यकीय माहिती बाहेर कशी पोहोचते?
या मागे कोणाचे संगनमत आहे का?
रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव?
फक्त रक्तचाचणीच नव्हे, तर सिरिंज, स्काल्प, औषधे यांसारखी मूलभूत साहित्यदेखील रुग्णांना बाहेरून आणण्यास सांगितले जात असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या रुग्णालयातच अशी परिस्थिती असेल, तर गरीब रुग्णांनी उपचार कसे घ्यावेत, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
प्रशासन हालचालीत
या प्रकरणी संबंधित डॉक्टर व परिचारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून आरोग्य अधिकारी प्रकाश पावरा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल गवळी यांनीही हा मुद्दा उचलून धरत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
‘आरोग्य हक्क’ फक्त घोषणांपुरताच?
जागतिक आरोग्य दिन च्या निमित्ताने ‘सर्वांसाठी आरोग्य सेवा’ हा संदेश दिला जात असताना, प्रत्यक्षात मात्र रुग्णालयातच रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
सरकारी रुग्णालयातही जर रुग्णांना खाजगी खर्चाचा भार सहन करावा लागत असेल, तर आरोग्य हक्काची अंमलबजावणी कितपत होते, हा प्रश्न अधिक गंभीर बनतो.
कारवाई होणार का?
आता महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधी या प्रकरणात ठोस पावले उचलणार का, दोषींवर कारवाई होणार का, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांना दिलासा मिळणार का—याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.

Comments
Post a Comment