ग्रामीण आरोग्यसेवेला सलाम : कोल्हापूरात १५ डॉक्टरांचा सन्मान, १२ एप्रिलला भव्य सोहळा

 ग्रामीण आरोग्यसेवेला सलाम : कोल्हापूरात १५ डॉक्टरांचा सन्मान, १२ एप्रिलला भव्य सोहळा




कोल्हापूर ०७ सिटी न्यूज नेटवर्क 

 शहरासह ग्रामीण भागात अहोरात्र सेवा देत सामान्यांच्या आरोग्याची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुढाकार घेत आहे. आरोग्यसेवा ही केवळ व्यवसाय नसून सामाजिक बांधिलकी आहे, या भावनेतून असोसिएशनतर्फे ८ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

फुलेवाडी येथील हॉटेल राहूल डिलक्समध्ये १२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता हा सोहळा पार पडणार असून खासदार श्रीमंत शाहू महाराज आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम रंगणार आहे.

या सोहळ्यात ‘केडीजीपीए धन्वंतरी पुरस्कार’ देऊन ग्रामीण आणि दुर्गम भागात कार्यरत १५ डॉक्टरांचा सन्मान केला जाणार आहे. करवीर, पन्हाळा, शाहुवाडी, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज, चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, कागल आदी तालुक्यांतील डॉक्टरांनी मर्यादित साधनसामग्रीतही रुग्णसेवा करत समाजात विश्वास निर्माण केला आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांना गौरविण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, बालिंगे येथील ज्येष्ठ डॉ. वसंत पाटील यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन त्यांच्या दीर्घकालीन सेवेला मानाचा मुजरा केला जाणार आहे. तसेच डॉ. राजकुमार पाटील, डॉ. बद्रुद्दीन मणेर आणि डॉ. प्रिया पाटील यांचा विशेष सन्मान होणार आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक रणदिवे आणि कार्याध्यक्ष डॉ. संजय केटकाळे यांनी सांगितले की, “ग्रामीण भागात अनेक डॉक्टर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सेवा देतात. त्यांच्या कार्याची समाजाने दखल घ्यावी आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.”

या उपक्रमातून डॉक्टरांच्या सामाजिक भूमिकेचा सन्मान होत असून, आरोग्यसेवा ही समाजाच्या विकासाचा कणा आहे, हा संदेशही अधोरेखित होत आहे.

Comments