पतसंस्थांना ५ लाखांचा विमा, UPI वापरासाठी प्रयत्न; खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही
महिला प्रदेशाध्यक्षपदी अरुंधती महाडिक यांची निवड; ‘सहकाररत्न’ पुरस्काराने गौरव
कोल्हापूर, ०३ सिटी न्यूज नेटवर्क
सहकारातून देश समृद्धीकडे वाटचाल करत असताना पतसंस्थांची भूमिका अधिक सक्षम करण्यासाठी ठोस प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. पतसंस्थांमधील ठेवींना ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळावे, UPI प्रणालीचा वापर करण्यास परवानगी द्यावी, तसेच सेवा सोसायट्यांना दिली जाणारी ४० प्रकारची कामे पतसंस्थांकडे वर्ग करावीत, या मागण्यांचा संसदेत पाठपुरावा करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे कोल्हापुरातील आनंद भवन येथे आयोजित सहकारी पतसंस्थांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘सहकाररत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
या मेळाव्यात फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी सौ. अरुंधती महाडिक यांची निवड जाहीर करण्यात आली. भागीरथी पतसंस्थेच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करत असल्याचे सांगत, नव्या जबाबदारीत सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
मेळाव्यास जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, फेडरेशनचे राज्याध्यक्ष काकाजी कोयटे, शांतीलाल शिंगे, शशिकांत राजोबा, राजश्री पाटील, सुरेखा लवांडे, डॉ. अंजली शहा, भारती मुथा, अनिल पाटील, सहकार नियामक मंडळाचे सदस्य सदाशिव भुसारे, तसेच चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
फेडरेशनचे अध्यक्ष काकाजी कोयटे यांनी राज्यातील पतसंस्थांची सद्यस्थिती, आव्हाने आणि प्रलंबित मागण्या मांडल्या. दरम्यान, भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कृष्णराज महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. बचत ही सवय लहानपणापासून अंगीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात झालेला हा मेळावा दुग्धशर्करा योग असल्याचे सांगत खासदार महाडिक यांनी सहकार क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे नमूद केले. देशभरातील पतसंस्था अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी केंद्रात स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून विविध धोरणे राबवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी कोल्हापुरात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासही सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले. मेळाव्यास राज्यातील १७ जिल्ह्यांतील पतसंस्थांचे संचालक, महिला पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment