छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 कोल्हापूरच्‍या मुलांची संभाजीनगर मात, मुली पराभूत

 

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 

कोल्हापूरच्‍या मुलांची संभाजीनगर मात, मुली पराभूत



बदलापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क 

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यजमान मुंबईसह कोल्‍हापूर, लातूरच्‍या संघानी अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली.१८ वर्षांखालील मुलांच्‍या गटात कोल्‍हापूर संघाने संभाजीनगर सहज मात करीत विजयी वाटचाल सुरू केली. २१ वर्षांखालील मुलींच्‍या गटातील पहिल्‍याच सामन्‍यात कोल्‍हापूरला पराभवाचा सामना करावा लागला. 



क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा बदलापूर जिमखाना मैदानावर रंगली आहे. कडक उन्‍हामुळे संध्याकाळी विघुतप्रकाश झोतात रंगलेल्‍या या स्‍पर्धेचा पहिला दिवस पुणे संघाने गाजविला. पुणे संघाच्‍या मुलींच्‍या दोन्‍ही संघाने विजयश्री प्राप्‍त केली.

  १८ वर्षांखालील मुलांच्‍या गटातील अटीतटीच्‍या लढतीत कोल्‍हापूर संघाने संभाजीनगरचा 25/14,25/10 गुणांनी पराभव करून गटात अव्‍वल स्‍थानावर झेप घेतली आहे. २१  वर्षांखालील मुलींच्‍या गटात नाशिककडून कोल्हापूरचा 25/7,25/9 गुणांनी पराभव झाला. 

साखळी पध्दतीने १८ व २१ वर्षांच्‍या मुला-मुलींच्‍या स्‍पर्धेत दोन गटात स्‍पर्धा सुरू रंगली आहे. 21 वर्षांखालील मुलांच्‍या गटात यजमान मुंबईने नाशिकला 25/10,25/12 गुणांनी नमवले. सामन्‍यात मुंबई संघाने सुरूवातीपासून आपली पकड कायम राखत विजयी वाटचाल सुरू केली आहे. या गटातील दुसऱ्या साखळी लढतीत लातूरने  कोल्हापूरवर 25/15,25/10 गुणांनी मात करीत विजयाचा झेंडा रोवला.  १८ वर्षांखालील मुलींच्‍या गटातही लातूरने नाशिकचा 25/6,25/11 गुणांनी धुव्‍वा उडवित मैदान गाजवले.  


मुलांच्‍या १८ वर्षांखालील गटातील पुणे विरूध्द नाशिक ही लढत शेवटच्‍या मिनिटापर्यंत चुरशीची झाली. सुरूवातीपासून पुणे संघाने आक्रमक खेळ करीत आघाडी घेतली.  पुण्याचा कर्णधार अनुज जोशीने मध्यरेषेवरून खेळताना जोरदार स्‍मॅशेस मारून गुणांची खाते उघडले. पाठोपाठ ओम झगडेने जोरदार प्रतिकार करीत तर स्‍वानंद राजोपाध्यने सुरेख पास करीत सामन्‍यावर वर्चस्‍व कायम राखले. नाशिक संघाने चिवट झुंज दुसऱ्या सेटमध्येही अपुरी ठरली. 


पुणे संघाच्‍या मुलींनी १८ व २१ वर्षांखालील दोन्‍ही गटातील लढती जिंकून आपली विजयाची दावदारी दाखवली. २१ वर्षांखालील गटात पुणे संघाने लातूरवर 25/11,25/16 गुणांनी सहज मात केली. 18 वर्षांखालील गटात गटात  पुणे संघाने संभाजीनगरवर 25/8,25/10 गुणांनी एकतर्फी विजय संपादन केला. 

खेळाडूंसाठी चक्‍क रिसोर्टमध्ये निवासव्‍यवस्‍था


शासकीय स्‍पर्धेच्‍या इतिहासात प्रथमच सर्व खेळाडूंची निवासव्‍यवस्‍था ही चक्‍क रिसार्टमध्ये करण्यात आली आहे. बदलापूरमधील सर्वच रिसोर्ट व्हॉलीबॉल स्‍पर्धेमुळे बुक झाले आहे. प्रथमच उत्तम दर्जाची निवास व्‍यवस्‍थेमुळे खेळाडू बदलापूरच्‍या पाहुणचाराचे कौतुक करीत आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालय  व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद हे एकत्रितपणे हा रिसार्टसाठी खर्च करणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या सूचनेनंतर आरामदायी निवास व्‍यवस्‍था उपलब्ध करण्यात आली आहे.

Comments