छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 : राज्‍य व्‍हॉलीबॉल स्‍पर्धेत पुणे विभागाला विजेतेपद


छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 : राज्‍य व्‍हॉलीबॉल स्‍पर्धेत पुणे विभागाला विजेतेपद



बदलापूर २० सिटी न्यूज नेटवर्क 

 क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्‍या १८ वर्षांखालील गटात नागपूरवर एकतर्फी मात करीत पुणे विभागाने विजेतेपदाला गवसणी घातली. मुंबई, कोल्‍हापर,लातूर विभागाने विजेतेपद पटकावले 


बदलापूर जिमखाना मैदानावर संपलेल्‍या राज्य व्हॉलीबॉल स्‍पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ आमदार किसन कथोरे व कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्‍या नगराध्यक्षा श्रीमती रूचिता घोरपडे यांच्‍या हस्‍ते झाला. याप्रसंगी मुख्यधिकारी मारूती गायकवाड,  नगरसेवक किरण भोईर, उपसंचालक नवनाथ फरताडे, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव निलेश जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के व  राज्‍य व्हॉलीबॉल असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते


विद्युत प्रकाशझोतात रंगलेल्‍या स्‍पर्धेत मुलींच्‍या १८ वर्षांखालील गटात पुणे विरूध्द नागपुर आमनासामना एकतर्फी झाला. अनुभवी खेळाडूंच्‍या भरणा असलेल्‍या पुणे विभागाने नागपूरचा २५-१९,२५-१८, २५-१६ गुणांनी विजेतेपद पटकावले.  साक्षी साळुंखे, वैष्णवी अडलिंगे व श्रेया चव्‍हाणने आक्रमण करीत पुणे संघाला विजयश्री बहाल केली. २१ वर्षांखालील मुलींच्‍या गटात  पुणे संघाने नागपूरवरच मात करीत तिसरे स्‍थान संपादन केले. 


१८ वर्षांखालील मुलांच्‍या गटात कोल्‍हापूरच्‍या संघ बाजीगर ठरला. २३-२५, २७-२५,२१-२५, २५-२० व १५-१२  गुणांनी  नागपूरचा पराभव करीत मैदान गाजवले. २१ वर्षांखालील मुलींच्‍या गटात  पराभवानंतर सलग ३ सेट जिंकून मुंबईने नाशिकचा लोळवून विजेतेपदावर नाव कोरले. १६-२५, २५-१८,२५-१९, २५-२१ गुणांनी मुंबई अजिंक्‍य ठरला.  रात्री अडीच वाजेपर्यंत रंगलेल्‍या २१ वर्षांखालील  मुलांच्‍या गटातील विजेतेपदाची लढत लातूरने जिंकली.  चार सेटपर्यंत रंगलेल्‍या लढतीत लातूरने २५-१६,१५-२५, २५-२१,२५-१९ गुणांनी मुंबईचा पराभव केला. 



पाच दिवस चाललेल्‍या या स्‍पर्धेत राज्‍यतील ८ विभागातील ३८४ खेळाडूंचा थरार रंगला. स्‍पर्धेत कोल्‍हापूर, लातूर, अमरावती, संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई व नाशिक या संघात चुरशीच्‍या लढती पहाण्यास मिळाल्‍या. १८ व २१ वर्षांखालील युवकांचा व्‍हॉलीबॉलचा थरार प्रथमच बदलापूरकरांनी अनुभवला. स्‍पर्धेतील विजेत्‍यांवे २३ लाख ३५ हजारांची रोख बक्षिसे व करंडक, पदकांनी कौतुक करण्यात आले. बदलापूर नगरी रंगलेला व्‍हॉलीबॉलचा रणसंग्राम पहाण्यासाठी बदलापूर जिमखाना मैदानावर सोमवारी रात्री अडीच वाजेपर्यंत प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.



व्‍हॉलीबॉलला बंदिस्‍त स्‍टेडियमची गरज

क्रिकेट तसे गल्‍लोगल्‍ली दिसते, तसेच व्‍हॉलीबॉल हा खेळ संपूर्ण राज्‍यात खेळला जातो. तालुका पातळीवरही कुस्‍तीनंतर व्‍हॉलीबॉलचे खेळाडू आहे. महाराष्ट्राचे खेळाडूंसाठी छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा ही प्रोत्‍साहन देणारी ठरली आहे. आता संघटनेला फक्‍त व्‍हॉलीबॉलला बंदिस्‍त स्‍टेडियम हवे. तसे झाल्‍यास राज्‍यातील व्‍हॉलीबॉल खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्‍तरावर चमकतील असे , महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव निलेश जगताप यांनी सांगितले.

Comments