सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त भव्य हिंदू एकता दिंडी

 

‘जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरी दुमदुमली

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त भव्य हिंदू एकता दिंडी



कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क 

सनातन संस्थेचे संस्थापक यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त रविवारी कोल्हापुरात भव्य हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले. ‘रामराज्य निर्माण अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीत विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था आणि हिंदुत्ववादी संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ‘जय श्रीराम’ आणि ‘राम कृष्ण हरि’च्या जयघोषाने करवीरनगरीतील वातावरण भक्तिमय झाले होते.



मिरजकर तिकटी येथून दिंडीला प्रारंभ झाला. प्रसिद्ध व्यावसायिक जयंतीभाई पटेल यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्री महालक्ष्मी देवी आणि श्री जोतिबा देव यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) येथे दिंडीची सांगता झाली.



दिंडीत चारचाकी वाहनावर उभारण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. दिंडीदरम्यान अनेक नागरिकांनी धर्मध्वजाची आरती ओवाळून तसेच पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

या दिंडीत वारकरी संप्रदाय, श्री संप्रदाय, भागिरथी महिला मंच, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, चिन्मय मिशन, इस्कॉन, भाजप, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू महासभा, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ यांसह विविध संघटनांचा सहभाग होता. सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि संत पू. दीपाली मतकर यांची विशेष उपस्थिती होती.

समारोपप्रसंगी सद्गुरु स्वाती खाडये, अभय वर्तक आणि आरोग्यभारतीच्या वैद्य अश्विनी माळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धर्मसेवकांना मार्गदर्शन’ या मराठी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

दिंडीत सव्यासाची गुरुकुलम् यांच्या वतीने शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण करण्यात आले. तसेच मर्दानी खेळ, लेझीम, गदा पथक, शाहिरी पथक, ढोलपथक, रणरागिणी पथक, वानर सेना पथक, वारकरी पथक अशा विविध ५० पथकांच्या सहभागामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. नऊवारी साडीतील कलशधारी महिला, पारंपरिक वेशातील साधक आणि स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करणारे क्षात्रवीर हेही आकर्षण ठरले.

Comments