ऑनलाईन औषध विक्रीविरोधात कोल्हापुरातील केमिस्टांचा एकदिवसीय लाक्षणिक बंद
कोल्हापूर २० सिटी न्यूज नेटवर्क
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD) तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व केमिस्ट आणि औषध विक्रेत्यांनी बुधवार दि. २० मे २०२६ रोजी एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळला. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, ई-फार्मसी पोर्टल्स आणि संबंधित शासन निर्णयांविरोधात हा बंद पुकारण्यात आला.
शिवाजी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवासी जिल्हाधिकारी मा. श्री. गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील २५०० हून अधिक केमिस्ट बंधू-भगिनी या आंदोलनात सहभागी झाले होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ऑनलाईन माध्यमातून औषधांची अनियंत्रित आणि बेकायदेशीर विक्री सुरू असून बनावट ई-प्रिस्क्रिप्शन, वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषध वितरण आणि अवाजवी सवलतींमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच लाखो लहान औषध विक्रेत्यांच्या अस्तित्वावरही गंभीर संकट निर्माण झाले आहे.
औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ अंतर्गत ऑनलाईन औषध विक्रीस स्पष्ट तरतूद नसतानाही विविध ऑनलाईन कंपन्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत असल्याचा आरोप करण्यात आला. कोविड काळात लागू करण्यात आलेली GSR 220(E) अधिसूचना आता आवश्यक नसून तिचा गैरवापर होत असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.
संघटनेने शासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत :
१) बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ कठोर कारवाई करावी.
२) वैध आणि सत्यापित ई-प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री व वितरण पूर्णपणे बंद करावे.
३) GSR 817(E) आणि GSR 220(E) अधिसूचना तात्काळ मागे घ्याव्यात.
४) ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलतींवर नियंत्रण आणावे.
यावेळी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील , सचिव प्रल्हाद खवरे तसेच सर्व असोसिएशनचे पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. औषध व्यापार हा आरोग्यसेवेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.



Comments
Post a Comment