सिद्धगिरी जननी भविष्यात देशाला दिशादर्शक कार्य करेल : खासदार सुधाकर सिंग

 सिद्धगिरी जननी भविष्यात देशाला दिशादर्शक कार्य करेल : खासदार सुधाकर सिंग



जागतिक मातृत्व दिन मोठ्या उत्साहात साजरा


कोल्हापूर, दि. ९ सिटी न्यूज नेटवर्क 

‘परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आणि भारतातील पहिल्या ट्रस्ट श्रेणीतील आयव्हीएफ सेंटर असलेल्या सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे कार्य भविष्यात देशाला दिशादर्शक ठरेल,’ असा विश्वास बिहारमधील बक्सरचे खासदार  यांनी व्यक्त केला. सिद्धगिरी जननी हॉस्पिटलमध्ये आयोजित जागतिक मातृत्व दिन सोहळ्यात ते बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर सिद्धगिरी जननीच्या प्रमुख संचालिका डॉ. वर्षा पाटील, केंद्रीय संयोजक बसंतकुमार सिंग आणि व्यवस्थापक विवेक सिद्ध उपस्थित होते.


खासदार सुधाकर सिंग म्हणाले, “भारत लोकसंख्येने मोठा देश असला तरी नवीन पिढी आणि वार्धक्याकडे झुकणारी पिढी यांच्यातील प्रमाणातील अंतर वाढत आहे. डॉ. वर्षा पाटील यांनी भारतातील घटणाऱ्या प्रजनन क्षमतेवर केलेले संशोधन अभ्यासपूर्ण आहे. बदलती जीवनशैली, विविध कृत्रिम आजार आणि वाढते वंध्यत्व ही भविष्यात गंभीर समस्या ठरणार आहे. अशा परिस्थितीत होलिस्टिक पद्धतीने उपचार देणारे सिद्धगिरी जननी हे अभिनव केंद्र म्हणून कार्यरत आहे.”


यावेळी त्यांनी ‘राष्ट्रीय समृद्ध मातृत्व अभियान’ औपचारिकरित्या सुरू झाल्याची घोषणा केली. तसेच या अभियानाचे नेतृत्व डॉ. वर्षा पाटील यांनी करावे, अशी विनंती करत या विषयावर शासकीय स्तरावर जनजागृतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


डॉ. वर्षा पाटील म्हणाल्या, “मातृत्व हे निसर्गाने स्त्रीला दिलेले वरदान आहे. बदलती जीवनशैली, आहार-विहार, अनुवांशिक समस्या आणि वाढता ताण यामुळे सुमारे ३१ टक्के लोकांमध्ये वंध्यत्व आढळून येत आहे. वंध्यत्व ही केवळ महिलांची समस्या नसून पुरुष आणि महिला दोघांचीही तपासणी आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्यास खर्चिक उपचार टाळता येतात. त्यामुळे जनजागृती आणि योग्य वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा आहे.”


केंद्रीय संयोजक बसंतकुमार सिंग यांनी मातृशक्तीचे महत्त्व अधोरेखित करत वंध्यत्व निवारणासाठी समाजाने जागृत होण्याची गरज व्यक्त केली.


प्रास्ताविकात विवेक सिद्ध म्हणाले, “मातृत्व हे मोजता न येणारे आणि व्यापता न येणारे अस्तित्व आहे. वात्सल्य सुखापासून कोणीही वंचित राहू नये या उद्देशाने पूज्य स्वामीजींच्या प्रेरणेने आणि डॉ. वर्षा पाटील यांच्या सेवाभावातून सिद्धगिरी जननी कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षांत शेकडो कुटुंबांना पालकत्वाचे सुख मिळाले आहे.”


कार्यक्रमात आगामी वाटचालीची माहितीपुस्तिका प्रकाशित करण्यात आली. तसेच ‘समृद्ध मातृत्व अभियान’ सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली. उपस्थितांनी हात उंचावून अभियानास अनुमोदन दिले.


यावेळी डॉ. भूषण सुतार, डॉ. सुषमा नाडीकर, डॉ. विशाल खलाटे, डॉ. सुशांत गुणे, डॉ. प्रशांत नाडीकर, डॉ. चिराग गांधी आणि डॉ. प्रियांका तेले यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. उज्वला माळी, डॉ. आरती माने, अनुराधा शिंदे, संजय पाटील, दिगंबर पाटील, किसन साळुंखे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन पुनीत मुचंडी यांनी केले.

Comments