मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ई-चलनांविरोधात बस व्यावसायिक आक्रमक
११ मेपासून कोल्हापूर आरटीओ कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा
कोल्हापूर, दि. ७ सिटी न्यूज नेटवर्क
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धावणाऱ्या खासगी बसांवर परिवहन विभागाकडून ई-चलनाद्वारे होत असलेल्या दंडात्मक कारवाईविरोधात बस व्यावसायिक आक्रमक झाले असून, अन्यायकारक दंड आकारणी तात्काळ थांबवावी, अन्यथा सोमवार दि. ११ मेपासून कोल्हापूर आरटीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी दिला आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत प्रदीप राठोड यांनी सांगितले की, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रोज शेकडो बसेस धावत असताना किरकोळ कारणांवरून हजारो रुपयांची ई-चलने पाठवली जात आहेत. काही ठिकाणी ताशी ३५ किंवा ४० किलोमीटरपेक्षा अधिक वेग दाखवून ४ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो, तर टोलनाक्यांवर लेन बदलल्यास २ हजार रुपयांचा दंड लावला जात आहे.
या दंडात्मक कारवाईमुळे प्रत्येक बसवर वार्षिक लाखो रुपयांचा आर्थिक बोजा पडत असून, अनेक बस चालक व मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वारंवार शासन, परिवहन विभाग तसेच लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
बहुतांश प्रकरणांमध्ये चालकाच्या चुकीसाठी थेट बस मालकाला जबाबदार धरले जात असून, ई-चलनांचा वाढता भार सहन करणे अशक्य होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दंड न भरल्यास बसेस ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“बस व्यावसायिकांची आर्थिक लूट थांबवून आतापर्यंत आकारण्यात आलेले दंड माफ करावेत आणि पुढील काळात अशा प्रकारची कारवाई थांबवावी,” अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास ११ मेपासून कोल्हापूर आरटीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
पत्रकार परिषदेस मनोज चौगुले, अशोक शिंदे, सतीशचंद्र कांबळे, गौरव कुशाले, पंकज त्रिपाठी, राजू ढाले, सुनील मगदूम आणि झाकीर तहसीलदार उपस्थित होते.

Comments
Post a Comment