इंडोकाउंट फाउंडेशन क्षयरुग्णांचे आधारवड : डॉ. हर्षला वेदक

 इंडोकाउंट फाउंडेशन क्षयरुग्णांचे आधारवड : डॉ. हर्षला वेदक



कोल्हापूर १३ सिटी न्यूज नेटवर्क 

प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत इंडोकाउंट फाउंडेशन, गोकुळ शिरगाव यांनी ‘निक्षय मित्र’ म्हणून गेल्या दीड वर्षात क्षयरुग्णांसाठी ११ हजारांहून अधिक पोषण आहार किटचे वाटप केले आहे. पुढील काळातही ही मदत सुरू ठेवण्याचा संकल्प फाउंडेशनने व्यक्त केला आहे.



याबद्दल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी आरोग्य विभागामार्फत इंडोकाउंटचे संचालक कमल मित्रा यांचा सन्मान करून आभार व्यक्त केले.



यावेळी बोलताना डॉ. वेदक म्हणाल्या की, इंडोकाउंट फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलकुमार जैन आणि संचालक कमल मित्रा यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग निर्मूलनासाठी मोठे कार्य सुरू आहे. पोषण आहार किटमुळे क्षयरुग्णांच्या उपचारांना मोठा आधार मिळत असून औषधोपचार अर्धवट सोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. “क्षयमुक्त कोल्हापूर” या उद्दिष्टपूर्तीसाठी इंडोकाउंट फाउंडेशनची मोलाची साथ लाभत आहे. तसेच वरिष्ठ सीएसआर सल्लागार डॉ. अमोल पाटील यांचेही विशेष सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.


इंडोकाउंटचे संचालक कमल मित्रा यांनी सांगितले की, इंडोकाउंट फाउंडेशन सीएसआरच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, पाणी व स्वच्छता, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत काम करत आहे. टीबी मुक्त अभियानांतर्गत ११ हजारांहून अधिक पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले असून चार मोबाईल मेडिकल व्हॅनच्या माध्यमातून १० लाखांहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले आहेत.


याशिवाय सीपीआर रुग्णालयातील विविध विभाग, आयजीएम, कागल, कसबा बावडा, कणेरी आणि तळंदगे येथील सरकारी रुग्णालयांना वैद्यकीय साहित्य पुरविण्यात आले आहे. एसपी कार्यालयात अत्याधुनिक व्यायामशाळा उभारणे, अंगणवाड्यांमध्ये ई-लर्निंग सुविधा, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह व्यवस्था, शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा, मोफत आरओ पाणी प्रकल्प, ५० हजारांहून अधिक वृक्षलागवड, कुस्ती संकुलासाठी उच्च दर्जाचे मॅट, वृद्धाश्रम, अंधशाळा व दिव्यांग संस्थांना मदत, मानसिक दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्य तसेच दुर्गम भागातील विद्यार्थिनींना सायकल वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


क्षयरुग्णांसाठी आणि “क्षयमुक्त भारत” अभियानासाठी भविष्यातही फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने मदत केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


कार्यक्रमाचे आभार वैद्यकीय अधिकारी डीटीसी कोल्हापूर डॉ. तेजल जाधव यांनी मानले.

Comments