अनयाज् चेस क्लब आयोजित आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख यांच्या कोल्हापुरातील ॲडव्हान्स बुद्धिबळ शिबिरास प्रारंभ
अनयाज् चेस क्लब आयोजित आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख यांच्या कोल्हापुरातील ॲडव्हान्स बुद्धिबळ शिबिरास प्रारंभ
कोल्हापूर ५ सिटी न्यूज नेटवर्क
हॉटेल कोहिनूर स्क्वेअर , दाभोळकर कॉर्नर,कोल्हापूर येथे अनयाज् चेस क्लब ने आयोजित केलेल्या भारतातील प्रसिद्ध बुद्धिबळ प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख यांच्या प्रगत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिरास आज प्रारंभ झाला. फक्त आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त असलेल्या बुद्धिबळपटूंसाठी आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये बेंगलोर, पुणे, बेळगाव, रत्नागिरी, गोवा, बारामती व स्थानिक कोल्हापूर, सांगली, जयसिंगपूर,इचलकरंजी, गडहिंग्लज येथील नामांकित 28 आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत या शिबिराचे उद्घाटन सेंट्रल जीएसटीचे ॲडिशनल कमिशनर शबरीश पिलाई, निपाणीचे उद्योजक व बुद्धिबळप्रेमी प्रवीणभाई शहा, युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसेस चे कॅप्टन उत्तम पाटील व निल पंडित बावडेकर सरकार यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, उत्कर्ष लोमटे, मनिष मारुलकर, अनिश गांधी, शशिकांत मक्तेदार व रोहित पोळ उपस्थित होते.
बुद्धिबळ ऑलंपियाड मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले व दोन वेळा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेले अनुप देशमुख भारतातील नामांकित बुद्धिबळ प्रशिक्षण म्हणून ओळखले जातात. त्यांनी आत्तापर्यंत सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी, ग्रँडमस्टर अभिजीत गुप्ता, ग्रँडमास्टर स्वप्निल धोपाडे, महिला वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुख, ग्रँडमास्टर रौनक साधवाणी, आंतरराष्ट्रीय मास्टर समीर कठमाळे, आंतरराष्ट्रीय महिला मास्टर कोल्हापूरची पल्लवी शहा व आंतरराष्ट्रीय महिला मास्टर निशा मोहता यांच्यासह हजारो बुद्धिबळपटूंना वेळोवेळी बुद्धिबळ प्रशिक्षण दिले आहे.
मूळचे अमरावतीचे असलेले अनुप देशमुख हे 1989 ते 92 दरम्यान साधारण तीन वर्ष कोल्हापूरमध्ये बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून वास्तव्यास होते. यादरम्यान त्यांनी पल्लवी शहा, श्रद्धा सामाणी,अर्जुन उबेरॉय, अनुप मराठे, हर्षद राजज्ञ, रेश्मा सुवर्णा या सारख्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या बुद्धिबळ पटूसह असंख्य बुद्धिबळपटू घडवले व कोल्हापूरचे बुद्धिबळ खऱ्या अर्थाने प्रगत केले होते. अनुप देशमुख सारख्या भारतातील दिग्गज प्रशिक्षकाचे ॲडव्हान्स बुद्धिबळ शिबिर कोल्हापुरात आयोजित करून अनयाज चेस क्लबने कोल्हापूरच्या उज्वल क्रीडा परंपरेत भर घातली आहे असे सेंट्रल जीएसटी चे ॲडिशनल कमिशनर सबरीश पिलाई यांनी उद्घाटन प्रसंगी आपले मत व्यक्त केले. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या दरम्यान दोन सत्रात एकूण चार दिवस चालणाऱ्या या शिबिरामधील सहभागी प्रशिक्षणार्थींना अनुप देशमुख सर प्रामुख्याने आजपर्यंत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन दर्जाच्या खेळाडूंच्या डावाचे सखोल विश्लेषण करून त्यांच्या विविध शैलीचा वापर प्रत्यक्षात कसा करायचा याचे तंत्र समजावून सांगून मार्गदर्शन करणार आहेत.

Comments
Post a Comment