"खाशाबा" चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

 


"खाशाबा" चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात



स्थगितीबाबत नागराज मंजुळे, जिओ स्टुडिओला नोटिस

कोल्हापूर ०५ सिटी न्यूज नेटवर्क 

खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडला आहे. न्यायालयात कॉपीराईटसंदर्भातील दावा प्रलंबित असतानाही चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्याने पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे, निर्माती ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शन यांना नोटिसा बजावल्या आहेत.

डिसेंबर 2024 मध्ये जाहीर झालेल्या या चित्रपटाच्या कथेबाबत सुरुवातीपासूनच वाद निर्माण झाला आहे. लेखक संजय दुधाणे यांनी त्यांच्या पुस्तकाच्या कॉपीराईट हक्कांबाबत न्यायालयात दावा दाखल केला असून, हा खटला सध्या सुरू आहे.

दुधाणे यांच्याकडे 2001 पासून खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे कॉपीराईट हक्क असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातील भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. असे असताना, 1 मेपासून चित्रपटगृहात ‘खाशाबा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल्याने त्यांनी आक्षेप घेतला आहे.

याप्रकरणी ॲड. रवींद्र शिंदे आणि ॲड. सुवर्णा शिंदे यांनी 2 मे रोजी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात चित्रपट प्रदर्शनास स्थगिती देण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला. न्यायालयाने या अर्जाची दखल घेत 8 मे रोजी तातडीच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत.


मंजुळेंच्या शपथपत्रात कथेबाबत उल्लेख

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लेखक संजय दुधाणे यांच्यावर 5 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणातील शपथपत्रातच संबंधित चित्रपटाची कथा दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे उल्लेख आढळतात


मंजुळे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये दुधाणे यांच्या नावाचा खाशाबा जाधव यांच्या कथालेखक म्हणून स्पष्ट उल्लेख आहे. तसेच त्यांनी दिलेले अनेक संदर्भही दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, या संदर्भात संपर्क साधूनही दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा प्रतिसाद मिळू शकला नाही. लेखक दुधाणे यांनी सांगितले की, “जिओ स्टुडिओ आणि ज्योती देशपांडे यांना आमचा विरोध नाही; मात्र मंजुळे यांनी माझ्यावर दाखल केलेल्या 5 कोटींच्या अब्रुनुकसान दाव्यातूनच चित्रपट माझ्या पुस्तकावर आधारित असल्याचे स्पष्ट होते.” प्रकरण न्यायालयात असल्याने अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.


Comments