जी एच रायसोनी स्मृती सात वर्षाखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवारी
कोल्हापूर, दि. १४ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर बुद्धिबळ संघटनेच्या वतीने जी एच रायसोनी स्मृती सात वर्षाखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवार, दि. १७ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
दाभोळकर कॉर्नर येथील अयोध्या टॉवर येथे होणाऱ्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने तसेच आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळ नियमांनुसार पार पडणार आहेत. या स्पर्धांना जी एच रायसोनी क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि कल्पना प्रकाश कल्याण प्रतिष्ठान यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. तसेच युनिव्हर्सल सुरक्षा सेवा संस्थेचे कॅप्टन उत्तम पाटील यांनी हॉल उपलब्ध करून सहकार्य केले आहे.
रविवारी सकाळी ९.३० वाजता उद्घाटन समारंभ होऊन स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील १ जानेवारी २०१९ किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलामुलींना सहभाग घेता येणार आहे.
या निवड स्पर्धेतून दोन मुले व दोन मुलींची निवड ३० व ३१ मे २०२६ रोजी पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.
मुले आणि मुली या दोन्ही गटांतील प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रोख १००० रुपये, ६०० रुपये व ४०० रुपये तसेच चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. दोन्ही गट मिळून एकूण ४ हजार रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय ८ उत्तेजनार्थ पदकेही प्रदान करण्यात येणार आहेत.
निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना राज्य निवड स्पर्धेत सहभागी होऊन आल्यानंतर संघटनेच्या वतीने प्रत्येकी १००० रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २०० रुपये ठेवण्यात आले असून इच्छुक खेळाडूंनी शनिवार, दि. १६ मे रोजी रात्री ८ वाजेपर्यंत प्रवेश फी सह आपली नोंदणी खालील प्रतिनिधीकडे करावी :
- आरती मोदी – ८१४९७४०४०५
- मनिष मारुलकर – ९९२२९६५१७३
- प्रीतम घोडके – ८२०८६५०३८८
- उत्कर्ष लोमटे – ९९२३०५८१४९
- रोहित पोळ – ९६५७३३३९२६
स्पर्धकांनी स्पर्धेस येताना दुपारच्या जेवणाचा डबा सोबत आणावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
.jpeg)
Comments
Post a Comment