ई-फार्मसीविरोधात कोल्हापुरातील ४ हजार औषध विक्रेत्यांचा एल्गार; आज जिल्हाभर मेडिकल बंद
कोल्हापूर २० सिटी न्यूज नेटवर्क
बेकायदेशीर आणि नियमबाह्य ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या ई-फार्मसी कंपन्यांविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून,आज बुधवारी (दि. २०) कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४ हजार औषध दुकाने बंद राहणार आहेत. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या देशव्यापी बंदच्या हाकेला यांनी पाठिंबा दिला आहे.
ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्या आणि झटपट होम डिलिव्हरी देणारे अॅप्स कोणतीही स्पष्ट कायदेशीर चौकट नसताना औषधांची विक्री करत असल्याचा आरोप केमिस्ट संघटनेने केला आहे. कोरोना काळात आपत्कालीन परिस्थितीसाठी लागू करण्यात आलेल्या जीएसआर २२० (ई) आणि जीएसआर ८१७ (ई) या अधिसूचनांचा गैरफायदा ई-फार्मसी कंपन्यांनी घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
दरम्यान, औषध दुकानदार सकाळी ११ वाजता मूक मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. शिवाजी चौक, लुगडी ओळ, महाराणा प्रताप चौक, फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी आणि व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष मदन पाटील आणि सचिव प्रल्हाद खवरे यांनी केले आहे.
.png)
Comments
Post a Comment