हिंदू देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ कायदा रहित करा - महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


हिंदू देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ कायदा रहित करा  - महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन




कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क 

देवस्थान जमिनी या केवळ महसुली नोंदीतील मालमत्ता नसून त्या श्रद्धा, परंपरा, संस्कृती आणि समाजजीवनाचा आधार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि छत्रपती शिवरायांच्या काळापासून अनेक राजांनी देवस्थानांच्या दैनंदिन धार्मिक विधींसाठी, मंदिरांचे संवर्धन, अन्नछत्रांसाठी आणि रुढी-परंपरा जोपासण्यासाठी जमिनी इनाम म्हणून दिल्या आहेत. सार्वजनिक ’महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०’ अन्वये कायद्यानुसार देवस्थानची ‘मूर्ती’ ही एक ‘कायदेशीर व्यक्ती’ मानली जाते आणि या जमिनींची मालकी त्या देवतेकडे असते. मात्र, प्रस्तावित कायद्याच्या कलम ३ आणि ४ नुसार, ही सर्व इनामे एका झटक्यात रद्द करून, त्या जमिनी वहिवाटदार किंवा पुजार्‍यांच्या नावे ‘मालक’ म्हणून वर्ग करण्याचा प्रयत्न चालू आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या मंदिरांच्या सेवेसाठी वापरल्या जाणार्‍या जमिनींचे व्यापारीकरण होईल आणि भविष्यात ही मंदिरे परावलंबी होतील. त्यामुळे हिंदू देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ कायदा रहित करावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना देण्यात आले. याच मागणीचे निवेदन हातकणंगले येथील तहसीलदार कार्यालय, तसेच शाहूवाडी येथे तहसीलदार कार्यालयात देण्यात आले. 


कोल्हापूर येथे निवेदन देण्यासाठी चंदगड येथील आमदार शिवाजीराव पाटील उपस्थित होते. मंदिर महासंघाची मागणी योग्य असून या संदर्भात शासनाकडे भूमिका मांडू, असे आश्‍वासन त्यांनी या प्रसंगी दिले.


कोल्हापूर येथे निवेदन देतांना मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अशोक गुरव, जोतिबा देवस्थान पुजारी श्री. रणजित चौगुले आणि श्री. आेंकार बनकर, माणगाव येथील मारुति मंदिराचे पुजारी श्री. कृष्णात गुरव, हरि पुजारी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रमसिंह जरग, सर्वश्री शशी बीडकर, तानाजी आंग्रे, भीमराव पाटील, दत्तात्रय गावडे, हिंदु महासभेचे श्री. प्रशांत पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.


या प्रसंगी करण्यात आलेल्या काही मागण्या


मसुदा प्रसिद्ध करण्यापूर्वी सर्व हिंदू धार्मिक संस्था, मठ, ट्रस्ट, धर्माचार्य, कायदे तज्ञ यांच्याशी चर्चा करावी,  मंदिरांच्या संपत्तीचे संरक्षण करणारे स्वतंत्र धोरण आणावे, देवस्थान जमिनीवरील वाद प्रकरणनिहाय सोडवावेत, ‘विकास’ किंवा ‘कुळवहिवाट’ या संकल्पनांचा वापर देवस्थानांच्या हक्कांवर परिणाम करणारा ठरू नये, यासाठी स्पष्ट संरक्षणात्मक तरतुदी कराव्यात. 



Comments