धरणग्रस्तांचा पुनर्वसनासाठी एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क
तुळशी धरणग्रस्त वसाहतीतील नागरिकांनी पुनर्वसन, जमीन आणि मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राधानगरी तालुक्यातील शिरोली धरणामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन १९७२-७३ साली शिरोली दुमाला ता.करवीर या ठिकाणी करण्यात आले. त्यावेळी शासनाने सर्वांना डोंगर कपारीत गट क्र १०४७ १२ एकर ८ गुंठे जमीन देण्यात आली.त्याचे १००% पुनर्वसन झाले नाही .
धरणग्रस्तांनी शासनावर पुनर्वसन प्रक्रियेत फसवणूक केल्याचा आरोप करत, “दलाल व गरिब कुणब्यांचा वापर करून आमचे जीवन उद्ध्वस्त केले,” असा संताप व्यक्त केला आहे. तसेच गावठाणासाठी दिलेली जमीन, पिण्याचे पाणी, रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा आणि शेतीयोग्य जमीन या प्रमुख मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धरणग्रस्तांच्या म्हणण्यानुसार, पुनर्वसनासाठी दिलेल्या जमिनींची मोजणी योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी गावकऱ्यांना अतिक्रमण, झाडे, घरे आणि शेतीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने तात्काळ दखल घेऊन सर्व धरणग्रस्तांना न्याय द्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी सुभाष देसाई, दयानंद कांबळे, विश्वास कांबळे, शिवाजी कांबळे, परशु कांबळे, मधुकर कांबळे, जीवन कांबळे, सुनील कांबळे, मारुती कांबळे, दौलू कांबळे, गंगाराम कांबळे, बाळासो कांबळे, गौतम कांबळे, सत्तापा कांबळे, सिद्धार्थ कांबळे, बापू कांबळे, एकनाथ कांबळे, दशरथ कांबळे, यशवंत कांबळे, दत्तात्रय कांबळे, पंडित कांबळे, अंकुश कांबळे, योगेश कांबळे, प्रकाश कांबळे, सुरेश कांबळे, धोंडीराम कांबळे आदी उपस्थित होते.


Comments
Post a Comment