‘वूलू’ स्वच्छतागृह महिला भाविकांसाठी आधारवड; मातृदिनानिमित्त भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट – कृष्णराज महाडिक

 


‘वूलू’ स्वच्छतागृह महिला भाविकांसाठी आधारवड; मातृदिनानिमित्त भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट – कृष्णराज महाडिक



कोल्हापूर १०  सिटी न्यूज नेटवर्क 

महिलांसाठी खासबाग मैदान आणि ताराबाई पार्क येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक महिला स्वच्छतागृहांचे लोकार्पण महापौर सौ. रुपाराणी निकम, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पा खोत आणि भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते पार पडले.

महिला भाविक, पर्यटक तसेच कोल्हापूरातील महिलांसाठी वातानुकूलित व सर्व सुविधांनी युक्त अशी आधुनिक स्वच्छतागृहे आता उपलब्ध झाली आहेत. ‘वूलू’ या स्मार्ट सॅनिटेशन सोल्यूशनमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून स्वच्छता, सुरक्षितता आणि सुविधा यांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. स्वच्छतागृहाला जोडून महिलांच्या गरजेच्या वस्तूंची विक्री करणारे दुकान उभारण्यात आले असून त्यातून बचत गटातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरासह पन्हाळा आणि ज्योतिबा दर्शनासाठी दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येतात. मात्र महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता असल्याने अनेकदा गैरसोयीचा सामना करावा लागत होता. महायुतीची सत्ता कोल्हापूर महापालिकेत आल्यानंतर हा विषय प्राधान्याने घेण्यात आला. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झाला.

यानंतर खासबाग मैदान चौक आणि ताराबाई पार्क येथील एसटी कार्यशाळेबाहेरील जागेत महिला स्वच्छतागृह उभारणीस प्रारंभ झाला. अवघ्या दोन महिन्यांत ही कामे पूर्ण करण्यात आली.

लोकार्पण सोहळ्यास खासदार श्री. धनंजय महाडिक, आमदार श्री. अशोकराव माने, उपमहापौर श्री. अक्षय जरग, सभापती श्री. विशाल शिराळे, गटनेते श्री. आदिल फरास, श्री. मुरलीधर जाधव, श्री. शारंगधर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कृष्णराज महाडिक यांनी ‘वूलू’ स्वच्छतागृहांच्या आधुनिकता, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती दिली. तसेच पंतप्रधान यांच्या स्वच्छ भारत अभियानातूनच ‘वूलू’ संकल्पनेला प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री , भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे आभार मानले. ‘वूलू’चे कोल्हापूर मॉडेल संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी महायुती सरकारने जनतेला दिलेली आश्वासने यापुढेही अशाच पद्धतीने पूर्ण केली जातील, असा विश्वास व्यक्त केला. महापौर सौ. रुपाराणी निकम यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, आश्किन आजरेकर, प्रकाश गवंडी, पूर्वा राणे, माधुरी नकाते, पल्लवी देसाई, रेखा उगवे, माधुरी व्हटकर, दीपा काटकर, सुरेखा ओटवकर, नेहा तेंडुलकर, अर्चना कोराणे, विजय खाडे पाटील, सृष्टी जाधव, दीपा ठाणेकर, महेश वासुदेव, उत्तम पाटील, युवा मोर्चाचे विश्वजीत पोवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments