२० मे रोजी देशव्यापी औषध विक्रेत्यांचा बंद; ऑनलाईन विक्री व कॉर्पोरेट स्पर्धेविरोधात एल्गार

 २० मे रोजी देशव्यापी औषध विक्रेत्यांचा बंद; ऑनलाईन विक्री व कॉर्पोरेट स्पर्धेविरोधात एल्गार



कोल्हापूर ०६ सिटी न्यूज नेटवर्क 

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना All India Organisation of Chemists and Druggists (AIOCD) च्या वतीने कायदेशीर चौकटीबाहेर सुरू असलेल्या ऑनलाईन औषध विक्री व कॉर्पोरेट कंपन्यांच्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंदची घोषणा करण्यात आली आहे. ही माहिती कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.


औषध व्यवसाय हा Drugs and Cosmetics Act 1940 व Rules 1945 अंतर्गत चालतो. मात्र ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भात या कायद्यात कोणतीही स्पष्ट तरतूद नसताना देशभरात सर्रास बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. केंद्र सरकारने २८ ऑगस्ट २०१८ रोजी GSR 517(E) अंतर्गत नोटिफिकेशन काढले असले, तरी त्याचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका प्रलंबित असून न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीवर स्थगितीही दिल्याचे पाटील यांनी सांगितले.


कोरोना काळात GSR 220(E) (दि. २६ मार्च २०२०) अंतर्गत औषधांची होम डिलिव्हरीसाठी तात्पुरती सवलत देण्यात आली होती. मात्र कोरोना संपून पाच वर्षे उलटूनही हे नोटिफिकेशन रद्द करण्यात आलेले नसल्याने ऑनलाईन कंपन्या त्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेलाही धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


तसेच Drug Price Control Order (DPCO) 2013 नुसार जीवनावश्यक औषधांवर रिटेलरला ८% आणि इतर औषधांवर ठराविक मर्यादित नफा दिला जातो. मात्र मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या २०% ते ५०% पर्यंत सूट देत असल्याने लहान औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. देशातील सुमारे १२.५० लाख औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचा इशारा देण्यात आला.


सरकारकडे वारंवार निवेदने देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. यासंदर्भात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निवेदन देण्यात आले, मात्र त्यावरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर संघटनेने आंदोलनात्मक भूमिका घेत देशव्यापी बंदचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.


या पत्रकार परिषदेला प्रल्हाद खवरे, संजय शेटे, दाजीबा पाटील, किरण जाधव, महेश सावंत, कैवल्य कुलकर्णी, आदित्य चौगुले, विजय देवणे, अतुल पाटील, पुरुषोत्तम महाराज यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


 २० मे रोजी देशभरातील औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments