"खाशाबा" चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर

 "खाशाबा" चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर



न्यायालयीन आयोगाचा अर्ज दाखल; नागराज मंजुळे अडचणीत?


पुणे १० सिटी न्यूज नेटवर्क 

 मोठ्या गाजावाजात जाहीर झालेला आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा ‘खाशाबा’ चित्रपट आता गंभीर न्यायालयीन वादाच्या भोवऱ्यात अडकला असून चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन आयोग नियुक्त करण्याच्या अर्जाला मंजुरी दिल्याने जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शनला मोठा धक्का बसला आहे.


दरम्यान, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी महाराष्ट्रभर दाखविण्यात आलेल्या ‘खाशाबा’ चित्रपटाच्या ट्रिझरमुळे हा वाद आणखी चिघळला. न्यायालयात कॉपीराईटचा दावा प्रलंबित असताना ट्रिझर प्रदर्शित केल्याबद्दल तातडीची सुनावणी घेण्यात आली.


मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे, ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शनविरोधात पुणे न्यायालयात कॉपीराईट दावा दाखल केला आहे. दुधाणे यांच्या ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या पुस्तकावरच चित्रपटाची कथा आधारित असल्याचा दावा करण्यात आला असून यासंदर्भातील तब्बल १६ पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.


सुनावणीदरम्यान नागराज मंजुळे यांचे वकील ॲड. रामकृष्ण कुलकर्णी यांनी जूनपर्यंत चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे न्यायालयात तोंडी सांगितले. त्यानंतर दुधाणे यांच्यावतीने ॲड. सुवर्णा शिंदे यांनी न्यायालयीन आयोग नेमण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आयोगाने चित्रपट पाहावा तसेच दुधाणे यांच्या पुस्तकाचा अभ्यास करून अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली. न्यायाधीश अग्रवाल यांनी हा अर्ज मान्य केला असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार आहे.


जिओ स्टुडिओ आणि ज्योती देशपांडे यांच्यावतीने ॲड. प्रियांका चौधरी यांनी बाजू मांडताना स्थगिती अर्ज फेटाळण्याची मागणी केली. मात्र, जिओ स्टुडिओकडून उत्तर वेळेत न मिळाल्याबद्दलही न्यायालयात नाराजी व्यक्त झाल्याची चर्चा आहे.


खाशाबा चित्रपटाविरोधात १४ नव्हे, तब्बल १६ पुरावे


संजय दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित कथाच चित्रपटात वापरण्यात आल्याचा दावा करत न्यायालयात अनेक धक्कादायक पुरावे सादर करण्यात आले आहेत. यामध्ये ट्रिझरमधील दृश्ये, रणजीत जाधव यांच्यासोबतचे करार, तसेच नागराज मंजुळे यांनी स्वतः दाखल केलेल्या ५ कोटींच्या अब्रूनुकसानीच्या दाव्यातील शपथपत्राचाही समावेश आहे.


विशेष म्हणजे, मंजुळे यांच्या शपथपत्रातील काही पानांवर दुधाणे यांचा कथालेखक म्हणून स्पष्ट उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच चित्रपटासाठी वापरण्यात आलेले संदर्भही दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे सांगण्यात आले.


यामुळे ‘खाशाबा’ चित्रपटाचा वाद आता केवळ कॉपीराईटपुरता मर्यादित न राहता मराठी चित्रपटसृष्टीतील मोठा कायदेशीर संघर्ष ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

Comments