अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत 50 टक्के मतदान - सोमवारी कोल्हापुरात मतमोजणी; कला विश्वाचे लक्ष निकालाकडे
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत 50 टक्के मतदान - सोमवारी कोल्हापुरात मतमोजणी; कला विश्वाचे लक्ष निकालाकडे
कोल्हापूर - ०७ ( राजेंद्र मकोटे )
महाराष्ट्रातील चित्रपट, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी सुमारे 50 टक्के मतदान झाले असून आता सोमवारी कोल्हापुरात होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण कला विश्वाचे लक्ष लागले आहे. एकूण 3,403 मतदारांपैकी 1,698 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे .
यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. प्रथमच कोल्हापूर, मुंबई आणि पुणे या पारंपरिक केंद्रांसह नाशिक आणि सोलापूर येथेही मतदारांच्या मागणीनुसार मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतील सभासदांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली.
निवडणुकीत सत्ताधारी गटाचे ‘ चित्रकर्मी पॅनेल ’ आणि विरोधी गटाचे ‘आपलं पॅनेल’ यांच्यात थेट सामना रंगला. त्याचबरोबर विविध अपक्ष उमेदवारांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरून मतदारांशी संपर्क साधला. विशेष म्हणजे, ‘महामंडळ बचाव’ या नावाने एकत्र आलेल्या तिसऱ्या आघाडीनेही स्वतंत्र प्रचार मोहीम राबवत मतदारांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. याशिवाय संग्राम भालकर यांच्यासह काही उमेदवारांनी स्वतंत्रपणे मतदारांकडे कौल मागितल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती.
गेल्या काही आठवड्यांपासून राज्यभरात प्रचाराचा धुरळा उडाला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, वितरक आणि विविध घटक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. महामंडळाच्या भविष्यातील धोरणांपासून ते मराठी चित्रपट उद्योगाच्या प्रश्नांपर्यंत अनेक मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिले.
सर्व मतदान केंद्रांवरील मतपेट्या रविवारी रात्री उशिरापर्यंत कोल्हापुरात दाखल होणार असून सोमवारी सकाळी 9 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर झाल्यामुळे मतमोजणीस वेळ लागण्याची शक्यता असून अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या रागिनी कडपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक रवींद्र बोरपाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वोच्च संघटनांपैकी एक असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नेतृत्वाची धुरा पुढील काळात कोणाच्या हाती जाणार, याकडे आता केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर राज्यातील संपूर्ण कला, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. सोमवारी होणारा निकाल महामंडळाच्या आगामी वाटचालीची दिशा निश्चित करणारा ठरणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


Comments
Post a Comment