जठारवाडी येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान व शेतकरी मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
कोल्हापूर (जठारवाडी) ११ सिटी न्यूज नेटवर्क
श्री सिद्धेश्वर विकास सेवा संस्था, जठारवाडी येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेलबिया अंतर्गत 'भुईमूग प्रात्यक्षिक बियाणे' वाटप आणि विशेष शेतकरी मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला. या वेळी उपस्थित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि कृषी उद्योगांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमात माननीय तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी विषमुक्त भाजीपाला शेतीचे महत्त्व पटवून दिले.
तसेच केंद्र सरकारच्या 'पीएमएफएमई' (PMFME) योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया क्षेत्रात सुरू करता येणाऱ्या विविध उद्योगांची आणि शासकीय अनुदानाची सविस्तर माहिती दिली.करवीरचे मंडळ कृषी अधिकारी नरेंद्र माने यांनी भुईमूग उत्पादकता वाढवण्यासाठी आवश्यक असणारी बीजप्रक्रिया आणि योग्य खत व्यवस्थापन याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. उप कृषी अधिकारी राहुल पाटील यांनी भुईमुगाच्या सुधारित वाणांची वैशिष्ट्ये सांगून, हवामान बदलात कोणते वाण फायदेशीर ठरेल यावर प्रकाश टाकला.या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील, सरपंच सुवर्णा जाधव आणि पंचायत समिती सदस्य उमा पाटील या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संग्राम जाधव यांनी केले. या मेळाव्याला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment