आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात ३० जूनला मुंबईत विराट महामोर्चा; राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने यांचे आवाहन
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित धोरणाविरोधात "आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती - महाराष्ट्र राज्य" आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी मुंबई येथे विधानसभा अधिवेशनावर विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मेट्रो सिनेमा येथून दुपारी १२ वाजता महामोर्चाला प्रारंभ होऊन आझाद मैदान येथे त्याची सांगता होणार आहे. राज्य सरकारच्या आरक्षणासंदर्भातील धोरणांमुळे अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून सामाजिक ऐक्याला धक्का पोहोचत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने म्हणाले की, अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा सामाजिक सलोखा आणि एकतेसाठी घातक असून त्यासाठी आवश्यक असलेला सखोल अभ्यास, विश्वासार्ह आकडेवारी आणि व्यापक सहमती नसताना हा विषय पुढे आणला जात आहे. त्यामुळे अनुसूचित जाती समाजातील विविध घटकांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यात अनुसूचित जाती-जमातींसाठी पदोन्नतीतील आरक्षण, रिक्त पदांची भरती, विकासनिधीचा वापर आणि रोजगारनिर्मिती यांसारखे मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना सरकारचे लक्ष मात्र उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर केंद्रीत झाल्याची टीकाही त्यांनी केली. आरक्षण उपवर्गीकरण हा कोणत्याही समाजघटकाविरोधातील संघर्ष नसून राज्य सरकारच्या धोरणांविरोधातील लोकशाही मार्गाने उभारलेला लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संविधानिक अधिकार, सामाजिक न्याय, आरक्षणाचे संरक्षण आणि बहुजन समाजातील एकता कायम राखण्यासाठी हा महामोर्चा आयोजित करण्यात आला असून राज्यातील फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या सर्व संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने यांनी केले.
या पत्रकार परिषदेला रामचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, मच्छिंद्र कांबळे, संभाजी कांबळे आणि सुशीलकुमार कोल्हटकर उपस्थित होते.

Comments
Post a Comment