प्रलंबित बिलांवरून ठेकेदारांचा एल्गार; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा!
कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क
शासकीय विभागांकडून कोट्यवधी रुपयांची प्रलंबित बिले अडकून पडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या ठेकेदारांचा संताप अखेर उफाळून आला आहे. कोल्हापूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनात शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत, प्रलंबित देयके तातडीने न दिल्यास संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
राज्यातील विविध भागांतून आलेले सुमारे १२०० ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि संघटनांचे प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले होते. अधिवेशनात ठेकेदारांनी शासनाच्या दिरंगाईवर जोरदार हल्लाबोल करत, “कामे पूर्ण केली, विकास घडवला; पण मोबदला मात्र मिळत नाही,” अशी संतप्त भावना व्यक्त केली.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. के. पाटील (तात्या) होते. प्रास्ताविकात किशोर जामदार यांनी ठेकेदारांच्या वाढत्या अडचणी मांडल्या, तर एन. डी. बापू लाड यांनी राज्यातील ठेकेदारांना एकत्र आणण्यासाठी फेडरेशनची गरज अधोरेखित केली. पुरवठादार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनीही या लढ्याला पाठिंबा जाहीर केला.
बँकांचे कर्ज, जीएसटी, मजुरी... ठेकेदार अक्षरशः कोंडीत
तांत्रिक सत्रात सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन, जलसंपदा, जलसंवर्धन आणि ग्रामीण विकास विभागांतील प्रलंबित देयकांचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला. बाबा गुंजाटे, बाळासाहेब जाधव, प्रशांत शेलार आणि सोहन दळवी यांनी विविध विभागांतील समस्या आणि तांत्रिक अडचणींची सविस्तर मांडणी केली.
चर्चेदरम्यान अनेक ठेकेदारांनी धक्कादायक वास्तव मांडले. बँकांचे वाढते कर्ज, व्याजाचा बोजा, जीएसटीची देणी, मजुरांचे पगार आणि साहित्य पुरवठादारांची थकबाकी यामुळे अनेक ठेकेदार आर्थिकदृष्ट्या कोलमडल्याचे सांगण्यात आले. काहींनी तर परिस्थिती इतकी गंभीर झाल्याचा दावा केला की, अनेक ठेकेदार आत्महत्येच्या मानसिकतेपर्यंत पोहोचल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
"बिले द्या, अन्यथा महाराष्ट्र ठप्प करू"
अधिवेशनातून शासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला की, सर्व विभागांची प्रलंबित देयके तातडीने अदा करण्यात यावीत. अन्यथा राज्यातील सर्व ठेकेदार संघटनांना एकत्र करून महाराष्ट्रभर एकाच वेळी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
नव्या फेडरेशनची स्थापना
ठेकेदारांच्या हक्कांसाठी संघटित आणि प्रभावी लढा उभारण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशन स्थापनेचा ठराव अधिवेशनात सर्वानुमते मंजूर करण्यात आला. राज्यभरातील ठेकेदारांना एकत्र आणून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय सावंत, बी. एस. पाटील, संजय पाटील, किरण माळी, प्रशांत कदम, निलेश पाटील, विशाल मोरे, दयानंद शिंदे, संदीप सावंत, कुलदीप पाटील आणि अनुप देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन ज्येष्ठ ठेकेदार सुनील नगराळे यांनी केले.
ठळक मुद्दा
"कामे पूर्ण, पण पैसे गायब; ठेकेदारांचा संताप शिगेला – आता शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी संघर्ष अटळ!"


Comments
Post a Comment