महाव्दार रोड रिक्षा, चारचाकींसाठी खुला करावा
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची वाहतूक पोलीस निरिक्षक नंदकुमार मोरे यांचेकडे मागणी
कोल्हापूर दि. ५ सिटी न्यूज नेटवर्क
महाव्दार रोड वरील वाहतूक कोंडी कमी करणेसाठी बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी व सरस्वती टॉकीज ते महाव्दार चौक मार्गे पापाची तिकटी हे दोन रस्ते रिक्षा व चारचाकी वाहनांसाठी बंद केले असले तरी या दोन्ही रस्त्यांवर व्यापार मोठ्या प्रमाणात असून रिक्षा व चारचाकी वाहनांसाठी वाहतूक बंद निर्णयामुळे व्यापारावर मोठा परिणाम होत असल्याने दोन्ही रस्ते रिक्षा व चारचाकींसाठी खुले करावेत याबाबतचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने वाहतूक पोलीस निरिक्षक नंदकुमार मोरे व पोलीस उपाधिक्षक (वाहतूक) ज्ञानेश गवई यांचेकडे सादर केले.
निवेदनात म्हंटले आहे, कोल्हापूर शहरातील वर्दळीचा परिसर असलेल्या महाव्दार रोड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी व सरस्वती टॉकीज ते महाव्दार चौक मार्गे पापाची तिकटी हे दोन रस्ते रिक्षा, चारचाकी यांना प्रायोगिक तत्वावर बंद केले आहेत व पुढील काळात त्याची कायमस्वरुपी अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
सदर दोन्हीं रस्त्यांवर व्यापारी पूर्वापार आपला व्यवसाय करत आहेत. त्यांच्या व्यवसायावर या निर्णयामुळे फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या रस्त्यांवर भांडी, कापड दुकान, कन्झ्युमर प्रोडक्ट तसेच कपिलतीर्थ मार्केट येथे किराणा व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. भांड्यांचा माल, कापडाचे गट्टे, बॉक्स यांची वाहतूक टेम्पो, रिक्षा अशा वाहनांतूनच करावी लागते. कपिलतीर्थ मार्केट मधील किराणा व्यापाऱ्यांचा माल तर मोठ्या पोत्यात भरुन मोठ्या वाहनातून आणावा लागतो. परंतू या वाहनांना हे रस्ते बंद असल्याने व्यापाऱ्यांना माल आस्थापनेत आणता येत नाही व डिलिव्हरीही देता येत नाही. तसेच ट्रक व तत्सम वाहनांना शहरांतर्गत वाहतूकीसाठी सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत मनाई आहे त्याचाही फटका व्यापाऱ्यांना काही वर्षांपासून बसत आहे.
वाहतूक कोंडीचा विचार करुन बिनखांबी गणेश मंदिर ते महाव्दार रोड हा मार्ग पूर्वीपासून एकेरी मार्ग केला आहे. परंतू, या रस्त्यावर एकेरी मार्गाचा अवलंब होताना दिसत नाही. अनेक दुचाकींसह इतर वाहनधारक या एकेरी मार्गाचा भंग करत आपली वाहने महाव्दार रोड वर चालवतात. त्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो याचा विचार व्हावा. महाव्दार रोड वर रिक्षा व चारकींसाठी मनाई करण्यामागील उद्देश स्पष्ट होण्याची गरज आहे.
सदर रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करणेसाठी हा निर्णय घेतला असला तरी या निर्णयामुळे या रस्त्यांवर अतिक्रमणासह फेरीवाल्यांची संख्या वाढण्याचा धोका आहे असे संजय शेटे यांनी सांगितले.
कोरोना, महापूर व ऑनलाईन व्यापारामुळे अगोदरच व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे. महाव्दार रोड वरील अनेक व्यावसायिक हे छोटे दुकानदार आहेत. रिक्षा व चारचाकींना मनाई केल्यामुळे त्यांचा व्यवसाय कोलमडण्याची शक्यता आहेत
चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहन पार्किंगसाठी दिशादर्शक फलक लावले तर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. दिशादर्शक फलक लावणेकामी कोल्हापूर चेंबर तर्फे जरुर ते सहकार्य केले जाईल. परंतु, रिक्षा आणि चारचाकींसाठी महाव्दार रोड बंदचा प्रायोगिक तत्वावर घेतलेला निर्णय मागे घेवून वाहतूक पूर्ववत सुरळीत चालू ठेवावी व तेथील व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा.
यावेळी संजय शेटे, प्रशांत शिंदे, विज्ञानंद मुंढे, धनंजय दुग्गे, संपत पाटील, राहुल नष्टे, शाम जोशी, डॉ गुरुदत्त म्हाडगुत, विजय नारायणपुरे,सागर कदम, महेश डोईफोडे, दिपक गुळवणी यांच्यासह महाव्दार रोड परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*

Comments
Post a Comment