कलासक्त परिवाराच्या वतीने द लिजंड स्वर्गीय राज कपूर यांचा ३८वा स्मृतिदिन साजरा
कोल्हापूर ०२ सिटी न्यूज नेटवर्क
द लिजंड स्वर्गीय राज कपूर यांच्या ३८ व्या स्मृतिदिनानिमित्त जुना वाशी नाका येथील राज कपूर स्मारकात कलासक्त परिवाराच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून राज कपूर यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमास नगरसेवक प्रसाद चव्हाण, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, प्रतीक पाटील, कलासक्त परिवाराचे दिनकर साळुंखे, नीलिमा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दिनकर साळुंखे यांनी कलासक्त परिवाराच्या वतीने लवकरच स्वर्गीय राज कपूर यांच्या गाण्यांवर आधारित १०० गाण्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते किशोर घाटगे यांनी सांगितले की, संभाजी पाटील यांच्या प्रयत्नांतून देशातील एकमेव स्वर्गीय राज कपूर यांचा पुतळा कोल्हापुरात उभारण्यात आला असून त्याचे उद्घाटन कपूर कुटुंबातील शशी कपूर यांच्या हस्ते झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून कलासक्त परिवार जयंती व स्मृतिदिनाच्या माध्यमातून राज कपूर यांच्या कार्याची आठवण जपत आहे.
यावेळी राज कपूर स्मारकाची दुरवस्था झाल्याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली. स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात यावे तसेच महापालिकेच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमांमध्ये स्वर्गीय राज कपूर यांचाही समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली.
उपमहापौर अक्षय जरग यांनी स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी लालासाहेब गायकवाड, डॉ. देवेंद्र रासकर, मोहन लोंढे, अमृता गलांडे, सुचित्रा खटावकर, राहुल मुचेंडेकर, महेश भंडारी, रवींद्र मिस्त्री, भगवान गायकवाड, युवराज जाधव, शिवराज सावंत, अनिल पाटील, सागर ठाणेकर, राजेंद्र मकोटे आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment