पावसाळ्याच्या तोंडावर स्प्रिंकलर सिस्टीम सुरू; पाण्याच्या अपव्ययाचा आरोप, त्वरित बंद करण्याची मागणी
कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महानगरपालिकेने गंगावेश, उमा टॉकीज चौक तसेच शहरातील विविध ठिकाणी धूळ प्रतिबंधक स्प्रिंकलर सिस्टीम सुरू केली असून, ही सिस्टीम तातडीने बंद करावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी केली आहे.
घाटगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात बसविण्यात आलेली ही स्प्रिंकलर सिस्टीम दिवाळीनंतर अनेक महिने बंद अवस्थेत होती. मात्र, आता पावसाळ्याच्या तोंडावर आणि शहरात पाणीटंचाईची समस्या असताना ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. सध्या या सिस्टीममधून २४ तास पाण्याचे फवारे उडत असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
"एकीकडे नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे महापालिका अशा प्रकारे पाण्याची उधळपट्टी करत आहे. हा प्रकार म्हणजे 'वरातीमागून घोडे' अशी परिस्थिती निर्माण करणारा असून महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचे द्योतक आहे," असेही घाटगे यांनी म्हटले आहे.
या स्प्रिंकलर सिस्टीमवर झालेल्या खर्चाची चौकशी करण्यात यावी तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ही यंत्रणा तात्पुरती त्वरित बंद करावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांच्यासह विक्रम जरग आणि संदीप सासणे यांनी केली आहे.
महापालिकेच्या या निर्णयाबाबत नागरिकांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment