जिओफायनान्स अॅपवर अतिरिक्त शिल्लक रकमेची गुंतवणूक आता अधिक सुलभ; जिओब्लॅकरॉक ओव्हरनाइट फंडची जोडणी
* जिओ पेमेंट्स बँकेच्या सेव्हिंग्स प्रो सुविधेमध्ये जिओब्लॅकरॉक ओव्हरनाइट फंडचा समावेश
* ग्राहकांना ₹5,000 ते ₹1.50 लाखांपर्यंत मर्यादा निश्चित करण्याची सुविधा
* ₹50,000 किंवा गुंतवलेल्या रकमेच्या 90 टक्क्यांपर्यंत तत्काळ रिडेम्प्शनची सुविधा
मुंबई,१७ सिटी न्यूज नेटवर्क
जिओफायनान्स अॅपवरील ग्राहकांना आता त्यांच्या खात्यातील अतिरिक्त शिल्लक रक्कम सहजपणे गुंतवणुकीत वळवता येणार आहे. जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटने जिओ पेमेंट्स बँकेच्या ‘सेव्हिंग्स प्रो’ सुविधेमध्ये जिओब्लॅकरॉक ओव्हरनाइट फंडचा समावेश केला आहे. या सुविधेचा लाभ जिओ पेमेंट्स बँकेच्या बचत आणि पगार खातेदारांना मिळणार आहे. जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट हा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि जगातील आघाडीच्या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या ब्लॅकरॉक यांचा संयुक्त उपक्रम आहे.
सेव्हिंग्स प्रो ही सुविधा बचत आणि गुंतवणूक यांचा प्रभावी संगम साधण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहक त्यांच्या बँक खात्यातील ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त असलेली अतिरिक्त रक्कम ओव्हरनाइट म्युच्युअल फंडामध्ये गुंतवू शकतील. डिजिटल बँकिंगची सोय आणि गुंतवणुकीपर्यंत सुलभ प्रवेश उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
ग्राहक या सुविधेमध्ये ऑटो-इन्व्हेस्ट पर्याय निवडू शकतात. यामध्ये ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असलेली रक्कम दररोज आपोआप गुंतवली जाईल. याशिवाय वन-टाइम इन्व्हेस्टमेंटचा पर्यायही उपलब्ध असेल, ज्याद्वारे ग्राहक त्वरित गुंतवणूक करू शकतील. ग्राहक ₹5,000 ते ₹1.50 लाखांदरम्यान स्वतःची मर्यादा निश्चित करू शकतील. या प्लॅटफॉर्मद्वारे दररोज गुंतवता येणारी कमाल रक्कम ₹1.50 लाख असेल.
या सुविधेमध्ये गुंतवणुकीतील रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ग्राहक ₹50,000 किंवा गुंतवलेल्या रकमेच्या 90 टक्के, यापैकी जी रक्कम कमी असेल ती तत्काळ रिडीम करू शकतील. यापेक्षा जास्त रकमेच्या रिडेम्प्शन विनंत्यांवर T+1 तत्त्वानुसार प्रक्रिया केली जाईल. या सुविधेसाठी कोणतेही एंट्री लोड, एक्झिट लोड, लॉक-इन कालावधी किंवा लपविलेले शुल्क आकारले जाणार नाही.
जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिड स्वामीनाथन म्हणाले, “आजचे ग्राहक त्यांच्या अतिरिक्त शिल्लक रकमेचे व्यवस्थापन करण्यासाठी सोपे आणि डिजिटल पर्याय शोधत आहेत. या एकत्रीकरणाद्वारे डिजिटल बँकिंगच्या सुविधेला ओव्हरनाइट फंड सोल्यूशनच्या उपलब्धतेची जोड दिली जात आहे.”
जिओ पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद ईश्वरन म्हणाले, “ग्राहकांसाठी डिजिटल आर्थिक उपाय अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. सेव्हिंग्स प्रो ही अतिरिक्त शिल्लक रकमेचे व्यवस्थापन करण्याची सोयीस्कर पद्धत असून, यामध्ये लवचिकता, तरलता आणि सहज प्रवेश कायम राहतो.”
सेव्हिंग्स प्रो साठीची ऑनबोर्डिंग प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असेल. ग्राहक जिओफायनान्स अॅपवर आधार आणि व्हिडिओ KYC द्वारे ही सुविधा सुरू करू शकतील. तसेच अॅपच्या माध्यमातून ते गुंतवणुकीची मर्यादा निश्चित किंवा बदलू शकतील, गुंतवणुकीचा मागोवा घेऊ शकतील आणि व्यवहारांची माहिती पाहू शकतील.
कंपनीच्या मते, दैनंदिन बँकिंग आणि गुंतवणूक सुविधा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
.jpeg)
Comments
Post a Comment