"विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार; जनसुराज्य शक्ती पक्षाच्या ‘ना नफा, ना तोटा’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद"

 "विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार; जनसुराज्य शक्ती पक्षाच्या ‘ना नफा, ना तोटा’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद"



कोल्हापूर १७ सिटी न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे तसेच सर्वसामान्य आणि गरजू कुटुंबांवरील शैक्षणिक खर्चाचा भार कमी व्हावा या सामाजिक उद्देशातून जनसुराज्य शक्ती पक्ष, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ना नफा, ना तोटा’ शैक्षणिक साहित्य विक्री उपक्रमाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



या उपक्रमांतर्गत नामांकित कंपन्यांच्या वह्या २५ टक्के ते ५० टक्के सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य कमी दरात मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असून उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व मार्गदर्शक डॉ. विनय कोरे (सावकार) यांनी भेट देऊन उपक्रमाची माहिती घेतली. शिक्षण क्षेत्रात सर्वसामान्य कुटुंबांना आधार देण्यासाठी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याची जनसुराज्य शक्ती पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हा उपक्रम दि. १६ जून २०२६ पर्यंत सुरू राहणार असून अधिकाधिक विद्यार्थी, पालक व नागरिकांनी भेट देऊन सवलतीच्या दरात उपलब्ध असलेल्या शैक्षणिक साहित्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

उद्घाटन प्रसंगी कोल्हापूरचे उपमहापौर अक्षय जरग, महानगरपालिका स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयेश (भाई) कदम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments