ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांना ध्रुवतारा फाऊंडेशनतर्फे खाशाबा जाधव पुरस्कार प्रदान
खाशाबांना पद्मविभूषण, तर मला शिवछत्रपती पुरस्कार मिळावा : बंडा पाटील
कोल्हापूर, दि. 23 सिटी न्यूज नेटवर्क
ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून ध्रुवतारा फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा मानाचा चौथा खाशाबा जाधव पुरस्कार यंदा ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी देशाचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण सन्मान मिळावा, तसेच स्वतःला शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी अपेक्षा बंडा पाटील यांनी व्यक्त केली.
कोल्हापूरातील ऐतिहासिक जिल्हा परिषद संचलित मेन राजाराम हायस्कूल सभागृहात झालेल्या कार्यक्रमात क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांच्या हस्ते बंडा पाटील यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी उद्योजक मनिष झंवर, रोहित मुसळे, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, प्राचार्य गजानन खाडे, लेखक संजय दुधाणे, वस्ताद बाबा महाडिक, शहाजी सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याच कार्यक्रमात राष्ट्रीय खो-खो खेळाडू सानिका चाफे, अमृता पाटील, श्रावणी पाटील, कुस्तीपटू पृथ्वीराज मोहिते आणि क्रीडा प्रशिक्षक भीमा भांदिगरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
मेन राजाराम हायस्कूलच्या या ऐतिहासिक सभागृहाला विशेष महत्त्व आहे. सन १९५२ मध्ये राजाराम महाविद्यालय येथे भरत असताना ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर खाशाबा जाधव यांचा नागरी सत्कार याच सभागृहात झाला होता. त्या आठवणींना उजाळा देत लेखक संजय दुधाणे यांनी खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव केला आणि नव्या पिढीतही असेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना बंडा पाटील म्हणाले, “माझे आदर्श असलेल्या खाशाबा जाधव यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे माझ्यासाठी परमभाग्य आहे. ऑलिम्पिकपटू असूनही मला अद्याप शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला नाही. शासनाने याची दखल घ्यावी, ही अपेक्षा आहे.”
अध्यक्षीय भाषणात क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी कोल्हापूरातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. खाशाबा जाधव यांच्यासारखे अनेक खेळाडू घडण्यासाठी अशा प्रेरणादायी उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा पाटील यांनी केले. तर आरोग्यसेवक राजेंद्र मकोटे यांनी आभार मानले. त्यांनी २०३४ ऑलिम्पिक स्पर्धांच्या आयोजनासाठी भारताच्या दाव्याला अधिक बळकटी देण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
सभागृहाला खाशाबा जाधव यांचे नाव देण्याचा प्रस्ताव
जिल्हा परिषद संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहाला खाशाबा जाधव यांचे नाव देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्या वर्षाराणी अरुण पाटील यांनी सादर केला असून, तो मंगळवारी होणाऱ्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे.
याचवेळी लेखक संजय दुधाणे यांनी खाशाबा जाधव यांचे तैलचित्र शाळेला भेट देण्याची घोषणा केली. क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ आणि नवोदित अशा चार पिढ्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे हा सोहळा भावपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.

Comments
Post a Comment