केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापुरात; अंबाबाई मंदिर पुनर्विकासाचा शिलान्यास, कृतज्ञता सभेतही उपस्थिती

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापुरात; अंबाबाई मंदिर पुनर्विकासाचा शिलान्यास, कृतज्ञता सभेतही उपस्थिती



कोल्हापूर, ता. १९ सिटी न्यूज नेटवर्क 

 केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा आज रात्री कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. २०) विविध महत्त्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली असून शहरात उत्साहाचे वातावरण आहे.


अमित शहा आणि त्यांच्या पत्नी सोनल शहा यांचे आज रात्री विशेष विमानाने कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात मुक्कामासाठी रवाना होतील.


शनिवारी सकाळी ९ वाजता अमित शहा करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व परिसर पुनर्विकास आराखड्याचा शिलान्यास करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मंदिर परिसराच्या विकासाला गती मिळणार असून भाविकांसाठी विविध आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.


दुपारी १२ वाजता पोलिस मैदान येथे आयोजित कृतज्ञता सभेत या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अमित शहा यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


यानंतर अमित शहा शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील. त्यानंतर ते इचलकरंजी येथे जाऊन जवाहर साखर कारखान्याच्या नामकरण सोहळ्यास उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर ते सायंकाळी विशेष विमानाने दिल्लीकडे रवाना होणार आहेत.


अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे कोल्हापूर शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

Comments