बँकेच्या प्रगतीमध्ये कर्ज वसुली अधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे - डॉ. सतीश घाळी
कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क
प्रचंड स्पर्धेच्या आजच्या बँकिंग विश्वात कर्ज वसुली करत असताना अवहेलना, गुंडगिरी अशा चित्रविचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत कोल्हापूर वसुली अधिकारी वर्गाचे कर्ज वसुलीचे कार्य लाख मोलाचे आहे ,त्यांच्या या कार्याच्या मागे वीरशैवसह सर्व बँकांचे पाठबळ राहील, असे प्रतिपादन वीरशैव सहकारी शेड्युल बँकेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक वसुली अधिकारी संघाच्या वतीने आज वसुली अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. घाळी बोलत होते.
त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यशाळेला प्रारंभ झाला.
वसुली अधिकाऱ्यांना शिस्तबद्ध कार्य करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी कार्याध्यक्ष अरविंद माने यांनी शपथ दिली.
या कार्यशाळेमध्ये इन्फोटेक मुंबईचे कार्यकारी संचालक वाल्मीक दराडे यांनी एआयचा वापर करून कर्ज वसुली कशा पद्धतीने करता येते याविषयी मार्गदर्शन केले. पुणे येथील शाहू सहकारी बँकेचे व्यवस्थापक राजेश यादव यांनी कर्ज वसुली कुशल पद्धतीने कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, कर्जदारापैकी कोणी ते बुडवेल हे काही कपाळावर लिहिलेले नसते. पण दक्ष राहून वसुलीकडे लक्ष दिले पाहिजे. सहकारातील १०१चा दावा असेल तर कर्ज वसुली शक्य असते. शिस्तबद्ध कर्ज वसुली करून बँकांचा एनपीए कमी करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यानुसार वसुली अधिकाऱ्यांनी काम करावे,असे ही त्यांनी नमूद केले .
प्रारंभी संस्थेचे निमंत्रक, बँकिंग तज्ञ किरण कर्नाड यांनी अद्यावत तंत्राचा वापर करून कर्ज वसुली कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. संघटनेचे महासचिव एन. एस. औंधकर यांनी स्वागत केले. अध्यक्ष प्रकाश निकम यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेऊन मागण्यांविषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी बँकेचे राजाराम शिपुगडे महालक्ष्मी बॅंकेच्या परजिता देसाई तसेच सुभाष ओंकार सतीश घाडगे यांच्यासह विविध सहकारी बँकेचे शहर जिल्ह्यातील पदाधिकारी - वसुली अधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment