मराठीतील पहिले रहस्यमय ‘युनिव्हर्स’ १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला; ‘घबाडकुंड’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला
मराठीतील पहिले रहस्यमय ‘युनिव्हर्स’ १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला; ‘घबाडकुंड’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला
मराठी मनोरंजन विश्वात लवकरच एक वेगळ्या धाटणीचा आणि रहस्य, थरार व भीतीचा संगम असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठीत प्रथमच रहस्यमय ‘युनिव्हर्स’ची संकल्पना साकारत हा चित्रपट १९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘घाबडकुंड’ची कथा अशा एका गूढ ठिकाणाभोवती फिरते, जिथे भूतकाळातील काही न उलगडलेली रहस्ये आजही जिवंत असल्याचे मानले जाते. या रहस्यांशी संबंधित घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होते. कथानक जसजसे पुढे सरकते, तसतसे नवीन प्रश्न निर्माण होत जातात आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा अनुभव मिळतो.
चित्रपटाचे दिग्दर्शन प्रितम एस. के. पाटील यांनी केले असून, ‘आयकॉन द स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ. रमेश कदम यांची निर्मिती लाभली आहे. उत्कंठावर्धक कथानक, प्रभावी छायांकन, दमदार पार्श्वसंगीत आणि थरारक सादरीकरणामुळे ‘घबाडकुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव ठरणार असल्याचा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
चित्रपटात शशांक शेंडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी करमाळकर, रंकी देशमुख, आरोही भोंडरे, योगेश प्रकाश तानपुरे आणि साहिल अनलटकर यांसह अनेक कलाकारांच्या दमदार भूमिका आहेत.
चित्रपटाचे लेखन संजय नवगिरे आणि अक्षय धर्मपाल यांनी केले आहे. गीतकार नसूम पठाण, कलादिग्दर्शक योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सोमनाथ धाराशिवकर यांनी केले आहे. प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी ॲक्शन दृश्यांची जबाबदारी सांभाळली असून, बॅकग्राऊंड म्युझिक, रेकॉर्डिंग आणि साऊंड डिझाइनची बाजूही सक्षम तंत्रज्ञांनी सांभाळली आहे.
रहस्य आणि थरार आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘घबाडकुंड’ हा चित्रपट एक पर्वणी ठरणार असून, मराठीसह दाक्षिणात्य भाषांमध्येही तो प्रदर्शित होणार आहे. १९ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडे मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments
Post a Comment