कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
कोल्हापूर, दि. १२ सिटी न्यूज नेटवर्क
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. बॅनर, पोस्टर आणि हारतुऱ्यांवरील खर्च टाळून गरजूंना मदत करण्याचा संदेश देत दिवसभर विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त शिये येथील करुणालय संस्थेतील एचआयव्हीग्रस्त मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांगांसाठी सहा व्हीलचेअर, सहा स्टिक आणि अन्य साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
उद्यमनगर येथील पांजरपोळ संस्थेत जनावरांसाठी दोन ट्रॉली चारा, फळे व भाजीपाला देण्यात आला. कार्यकर्त्यांनी जनावरांना खाद्य वाटप करत गोरक्षणाची शपथ घेतली. यावेळी विविध सामाजिक संस्थांनीही जनावरांच्या संगोपनासाठी योगदान दिले.
सीपीआर चौकात रुग्णांचे नातेवाईक, गरजू नागरिक व फिरस्त्यांसाठी अन्नदान कार्यक्रम राबविण्यात आला. तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील गरजू नागरिक, फेरीवाले आणि फिरस्त्यांना १०० छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी मिरजकर तिकटी येथे ‘नशामुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यात वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये जनजागृती करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
खासदार यांचे सुपुत्र व युवा नेते कृष्णराज महाडिक यांनी वाढदिवसानिमित्त हारतुरे व डिजिटल फलक न लावण्याचे आवाहन केले होते. कार्यकर्त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सामाजिक कार्यांना प्राधान्य दिले.
दिवसभर चाललेल्या उपक्रमांनंतर भाजप कार्यालयात कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री , लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना कृष्णराज महाडिक यांनी, "समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. नशामुक्त महाराष्ट्रासारख्या जनजागृती उपक्रमांची समाजाला आज मोठी गरज आहे," असे सांगितले.
वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमांचे नागरिकांनी स्वागत करत भाजप युवा मोर्चाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.



Comments
Post a Comment