इचलकरंजीत गुणवंत विद्यार्थ्यांचा जल्लोषात सन्मान
पोलिस मित्र असोसिएशन आणि वेध फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम
इचलकरंजी ०२ सिटी न्यूज नेटवर्क
कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळाल्यास समाजाला प्रेरणा मिळते, या उद्देशाने पोलिस मित्र असोसिएशन आणि वेध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. फॉर्च्युन प्लाझा येथील दरबार हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वाघमारे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हीच खरी समाजसेवा असल्याचे सांगत, पोलिसांची भूमिका केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यापुरती मर्यादित नसून समाजप्रबोधनाचीही असल्याचे स्पष्ट केले.
प्रमुख अतिथी म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेच्या महिला व बालविकास सभापती रुपाली सातपुते तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष नरसिंह वझे उपस्थित होते. विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आघाडी घ्यावी, असे आवाहन रुपाली सातपुते यांनी केले. तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणासोबत कौशल्य विकासाचे महत्त्वही तितकेच असल्याचे नरसिंह वझे यांनी नमूद केले.
१०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव
दहावीमध्ये १०० टक्के गुण मिळविणाऱ्या चिन्मयी चेतन उत्तुरकर आणि समृद्धी सोमनाथ बोळाज, तसेच बारावीमध्ये अदिती अजय तासगावे आणि समर्थ शिवशरण येळसंगी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशोगाथा सांगताना अशा सन्मानामुळे अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पोलिस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज मोरे यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रेरणा देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वेध फाउंडेशनच्या संस्थापिका तथा पोलिस मित्र असोसिएशनच्या महिला राज्याध्यक्षा डॉ. रजनीताई शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य संपर्क प्रमुख मुरलीधर शिंदे, महिला शहराध्यक्षा आशा वाघिरे, शिरोळ तालुका उपाध्यक्षा वैशाली गडद, शहर उपाध्यक्षा सरस्वती हजारे, सहसचिव मनिषा आवळे, संघटीका शकुंतला पाटील आणि उपाध्यक्ष सोहेल रंगरेज यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केले.
संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अशा उपक्रमांमुळे शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Comments
Post a Comment