पुरेशा पावसानंतरच पेरणी करा; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

 पुरेशा पावसानंतरच पेरणी करा; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन



कोल्हापूर ११ सिटी न्यूज नेटवर्क 

 कृषी हवामान विभागाच्या अंदाजानुसार १५ जूननंतर चांगल्या पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी, असे आवाहन करवीर तालुक्याचे कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी केले आहे.



करवीर तालुक्यात दरवर्षी सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांची लागवड केली जाते. यामध्ये भात, भुईमूग आणि सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत. भात पिकाची सुमारे ६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड व पेरणी केली जाते.


यंदा तालुक्यात भाताची धूळपेरणी सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झाली असून हे प्रमाण एकूण क्षेत्राच्या जवळपास ५० टक्के आहे. सध्या शेतकरी आंतरमशागतीची कामे करत असून पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक उपाययोजना राबवत आहेत.


दरम्यान, भुईमूग आणि सोयाबीन पिकांची पेरणी अद्याप सुरू झालेली नसून, पुरेसा पाऊस झाल्यानंतरच या पिकांची पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळण्यास मदत होणार असल्याचे कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी सांगितले.


कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी योग्य वेळी पेरणी करून खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सज्ज होत आहेत.

Comments