महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी रवींद्र माणगावे, उपाध्यक्षपदी संजय शेटे बिनविरोध
पश्चिम महाराष्ट्रातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह दहा जणांची गव्हर्निंग कौन्सिलवर निवड
कोल्हापूर, दि. ३ सिटी न्यूज नेटवर्क
राज्याच्या व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि कृषी क्षेत्रातील शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबईच्या अध्यक्षपदी सांगलीचे प्रसिद्ध उद्योजक रवींद्र परिसा माणगावे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागातून कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय धनपाल शेटे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
याचबरोबर गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी आमदार राजेंद्र शामराव पाटील-यड्रावकर, आनंद शंकरराव माने, राजू तुकाराम पाटील, प्रशांत शशीकांत शिंदे, अजित सोहनलाल कोठारी, धनंजय सुरेश दुग्गे, संजय कुमार पाटील, धैर्यशील हिंदुराव पाटील, गोरख शंकर माळी आणि नंदकुमार रमणलाल शहा यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा मुख्य निवडणूक अधिकारी सुरेश घोरपडे यांनी केली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर ही राज्यातील व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून पुढील वर्षी ही संस्था आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील व्यापारी आणि उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर पाठपुरावा केला जातो.
नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सांगितले की, शताब्दी वर्षानिमित्त ‘गाव तेथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासह वर्षभर विविध योजना आणि कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. राज्यातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर अधिक सक्रिय भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर नवनिर्वाचित उपाध्यक्ष संजय शेटे यांनी राज्यस्तरावरील तसेच स्थानिक पातळीवरील व्यापारी आणि उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
या सर्व निवडींबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment